वणी शहरात दुपारी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस
रस्त्याला आले नाल्याचे स्वरुप, सर्वसामान्यांची तारांबळ
जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी पावसाने उग्र रुप धारण केले. दुपारी 3 नंतर शहरात धुवाधार पाऊस पडला. हा पाऊस सुमारे 2 तास सुरू होता. त्यानंतर एक ते दिड तास पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले.
सध्या उन्ह पावसाचा खेळ सुरू आहे. आज गुरुवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपार पर्यंत शहरात उन्ह होते. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले. दुपारी 3 नंतर धुवाधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे दोन तास म्हणजेच 5 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात असलेल्या अनेक भागात पाणी साचले. मोमिनपुरा येथे रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले. ड्रेनेजसाठी छोट्या पाईपची व्यवस्था केल्याने चेंबरमधून पाणी बाहेर येऊन वाहत असल्याचा आरोप मोमिनपुरा येथील रहिवाशांचा आहे.
सर्वसामान्यांची उडाली तारांबळ
बाजार, कार्यालयीन कामे, नोकरी, मजुरी इत्यादीसाठी मोठ्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक वणी शहरात येतात. सकाळपासून उन्ह असल्याने मुसळधार पावसाची कुणीही अपेक्षा केली नव्हती. मात्र दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची चांगली पंचायत झाली.
दुपारचा पाऊस हा विजेचा कडकडाटसह होता. तालुक्यातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याची माहिती आहे. सुदैवाने तालक्यात अद्याप कोणतीही अनुचित घटना घडल्याची माहिती आलेली नाही.
हे देखील वाचा:
Comments are closed.