उच्च शिक्षण प्रवेशासंबंधी महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना दिलासा

शिक्षणमंचाच्या निवेदनावर विद्यापीठाची कार्यवाही

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. नीट, जेईईसारख्या परीक्षांच्या निर्णयावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब न झाल्यामुळे पालक व विद्यार्थी पुढील प्रवेशासंदर्भात संभ्रमात आहेत.

त्यामुळे कुठल्याही महाविद्यालयांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. महाविद्यालयांपुढे ही मोठी समस्या उभी ठाकली असल्याची बाब अनेक प्राचार्यांनी शिक्षणमंच संघटनेकडे मांडली होती. विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन ही प्रक्रिया पूर्णत्वास जाणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते.

महाविद्यालय पालक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी ही कठीण समस्या होऊन बसल्याची जाणीव होऊन यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भूमिका प्रकर्षांने पुढे आली होती. यावर शिक्षण मंचद्वारा अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने घोषित केलेली मुदत वाढविण्याबद्दल कुलगुरूना निवेदन दिले.

मुदत संपल्यानंतर कुलगुरूंच्या परवानगीने प्रवेश घेण्याची पद्धत सर्व महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांसाठी किचकट ठरणार होती. त्यामुळे ही मुदत सरसकटपणे वाढवावी अशी विनंती करण्यात आली.

शिष्टमंडळासोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण मंचची विनंती मान्य करून कुलगुरूंनी प्रवेश मुदत दिनांक ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्यासाठीचे विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले. महाविद्यालये तसेच विद्यार्थी व पालकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण मंचने मा कुलगुरूंचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.