हिलटॉप आंदोलन – दुस-या दिवशीही कोळसा खाणीतील उत्पादन ठप्प

रात्री 10 वाजता जीएम यांची भेट, मात्र तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरुच

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलिच्या कोळसा खाणीत ओबी डंपिंगचे काम करणाऱ्या हिलटॉप कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. गुरुवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. रात्री 10 वाजता आंदोलनस्थळी वेकोलिच्या जीएम यांनी भेट दिली. मध्यरात्री 12.30 वाजेपर्यंत आंदोलकांसोबत त्यांच्या वाटाघाटी झाल्या. मात्र त्यातून कोणताही मार्ग निघू शकला नाही. दरम्यान दुस-या दिवशीही आंदोलनामुळे कोलार पिंपरी ओपन कास्ट खाणीतील काम बंद होते. जोपर्यंत योग्य तो तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार व खाणीतील काम बंद राहणार, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.

हिलटॉपकंपनीद्वारा परप्रांतीय कामगारांना 30 दिवस काम दिले जात आहे, तर स्थानिकांना केवळ 18 दिवस काम दिले जात आहे. त्याविरोधात तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्त्वात सध्या आंदोलन सुरु आहे. हिलटॉप कंपनीत जवळपास 70 स्थानिक युवा कामगार हेल्पर म्हणून काम करतात. त्यांना केवळ 18 दिवस काम दिले जाते. तर इतर परप्रांतिय कामगारांना कंपनी 30 दिवस काम देत आहे. हा स्थानिक कामगारांवर अन्याय असून स्थानिकांना महिन्यातील किमान 26 दिवस काम द्यावे, अशी मागणी आंदोलकांची आहे.

या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू चांदेकर, कोलार पिंपरीचे सरपंच अतुल बोंड, निळापूरचे अनिल बोढाले, ब्राम्हणीचे उपसरपंच बाळू खामनकर यांच्यासह हिलटॉप कंपनीतील कामगार सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments are closed.