खचलेल्या कुटुंबाला देरकर यांचा मायेचा आधार
आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबाला सांत्वनरुपात आर्थिक मदत
निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील इजासन येथील रामचंद्र दोरखंडे या अल्पभुधारक शेतक-याने पंधरा दिवसांआधी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी संजय देरकर यांनी इजासन येथे जाऊन दोरखंडे कुटुंबाची भेट घेत या कुटुंबाला आर्थिक मदत करत या कुटुंबाच्या हुंदक्यांना मायेचा आधार दिला.
रामचंद्र दोरखंडे हे इजासन येथील रहिवाशी होते. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यावरच त्यांची उपजिविका चालायची. आई इंद्रा दोरखंडे, पत्नी अर्चना दोरखंडे, गतीमंद बहिण चंद्रा व तीन मुली असे सहा व्यक्ती त्यांच्या कुटुंबात आहे. कुटुंबात ते एकच व्यक्ती कमावते होते. मुलींचा शिक्षणाचा खर्च, सततची नापिकी, कर्ज याला कंटाळून त्यांनी दिनांक 25 जुलै रोजी आत्महत्या केली. घरच्या एकमेव कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने दोरखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अचानक आलेल्या या संकटामुळे दोरखंडे कुटुंब खचून गेले होते. दरम्यान याबाबतची माहिती संजय देरकर यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन इजासन येथे जाऊन दोरखंडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली व त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. यावेळी इजासनचे सरपंच बाबाराव धनकसार, पोलीस पाटील विलास मेश्राम, भगवान मोहिते, गणेश सुंकुरवार, संजय देठे, संकेत मोहिते, सुनील मडावी, अविनाश मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.