अवैधरित्या रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कार्यवाही

ट्रॅक्टर मालकांना 2 लाख 8 हजारांचा दंड

0 594

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन, दिग्रस व सातपल्ली या तीन ठिकाणी छावण्या लावल्या असून यातील कर्मचारी व अधिका-यांनी रेती तस्करांवर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. यासाठी दिवस रात्र धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. १९ मे च्या रात्री १२.३० वाजता गस्त घालतांना कोसारा-बोपापुर मार्गावरील एका नाल्यातून रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. रात्रीच पोलिसांना पाचारण करून दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लावण्यात आले. रेती ट्रॅक्टर मालक सीताराम विठोबा आवारी व मोरेश्वर पुंडलिक पिंपळकर दोघेही रा. बोपापूर यांचे असून ट्रॅक्टर मालक पिंपळकर यांच्या ट्रॅक्टरवर १ लाख ७ हजार ९०० रुपये तर आवारी यांच्या ट्रॅक्टरवर १ लाख दंड आकारण्यात आला आहे.

मुकुटबन परिसरात हिरापूर, मुंजळा, परसोडा व हिरापूर पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. यात महसूल विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यात महसूल खात्यातीलच कर्मचारी व कोतवालामुळे रेती तस्करांना बळ मिळत असून यामुळे तस्करीत वाढ झाल्यास दिसून येत आहे. शिवाय अशा भ्रष्ट कर्मचा-यांमुळे कार्यवाहिस मोठी अडचण निर्माण होत आहे. या चोरट्यांवरही कार्यवाही व्हावी जेणे करून रेती तस्करीवर आळा बसेल अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. सदर कार्यवाही मंडळ अधिकारी लहू चांदेकर, चंद्रकांत भोयर तलाठी चव्हाण, पेंदोर व वेटे यांनी केली.

Comments
Loading...