दारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

आठ दिवसांआधीच झाले मुलीचे लग्न

0 1,193

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका इसमाने सोमवारी रात्री दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेच्या रात्री सदर व्यक्तीने दारूच्या नशेत कुटुंबीयांशी भांडण केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या मुलीचे आठ दिवसांआधीच लग्न झाले होते.

प्रकाश अक्केवार (52) हा मुकुटबन येथील रहिवाशी होता. तो टेलरिंग काम करून उदरनिर्वाह करायचा. 20 मे सोमवारी तो घरी दारू पिऊन आला. त्यावेळी त्याने पत्नी व मुलासोबत जोरदार भांडण केले. त्यानंतर त्याने पत्नी व मुलाला घराबाहेर हाकलले. त्यामुळे त्याची पत्नी व मुलगा रात्री 11 च्या सुमारास दुस-याच्या घरी झोपायला गेले व प्रकाशने घराचा दरवाजा बंद केला.

दुस-या दिवशी पहाटे शेजारी राहणा-या एका वृद्ध महिलेला शंका आल्याने तिने शेजारी असलेल्या दिनेश गडेवार व आकाश भोयर यांना याबाबत माहिती दिली. त्यावरून त्यांनी दाराच्या फटीतून बघितले असता त्यांना प्रकाशने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार आकाश भोयर याने मृतकाच्या मुलाला व पत्नीला सांगितला. मृतकाचा मुलगा व आकाश घरावर चढून मागच्या दरवाज्यातून जाऊन पुढचा दरवाजा उघडला परंतु त्यांना प्रकाशचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

मृतकाच्या मुलाने पोलीस स्टेशन गाठून याबाबत माहिती दिली. दारूच्या नशेत वडिलांनी आत्महत्या केल्याचा संशय त्यांच्या मुलाने व्यक्त केला. तक्रारीवरून पीएसआय नितीन चुलपार, मारोती टोंगे, सुलभ उईके व राम गडदे घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह खाली उतरून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविले. विशेष म्हणजे मृतक प्रकाशने आपल्या मुलीचे लग्न आठ दिवसांपूर्वीच केले होते. मृतकाच्या मागे आई, पत्नी,मुलगा व लग्न झालेली मुलगी असा परिवार आहे.

Comments
Loading...