जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात महत्वाचे असलेले वणी पोलीस स्टेशनचा कारभार मागील 15 दिवसांपासून ठाणेदार विनाच सुरु आहे. पत्रकारावरील हल्ल्यानंतर ठाणेदार पोनि रामकृष्ण महल्ले 14 ऑक्टो. पासून रजेवर आहे. तेव्हापासून सपोनि माया चाटसे प्रभारी ठाणेदार म्हणून ठाण्याचा कामकाज सांभाळत आहे. दिवाळीपूर्वी वणीत नवीन ठाणेदाराची नेमणूक होईल अशी चर्चा होती. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांची बदली झाल्यामुळे वणी ठाणेदाराची नियुक्ती रखडली. त्यामुळे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड वणी पोलीस स्टेशनची धुरा कोणाच्या हातात देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील काही महिन्यात वणी शहर व परिसरात चोरी व घरफोडीच्या अनेक घटना घडूनही स्थानिक पोलीस चोरट्यांचा सुगावा घेण्यास अपयशी ठरली. अशातच 12 ऑक्टो. रोजी पत्रकार आसिफ शेख यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या कुख्यात चोरटा नावेद उर्फ गब्या याने आसिफ शेख यांच्या डोक्यावर लोखंडी राडने जबर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामुळे वणी शहरातील सर्व पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ठाणेदार रामकृष्ण महल्ले याना तात्काळ हटविण्याची मागणी केली.
पत्रकारांच्या मागणीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाठिंबा देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व विशेष पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकांत मीना यांच्याकडे ठाणेदाराच्या बदलीची मागणी केली. दुसरीकडे येथील समाजसेवक नारायण गोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रकाराच्या निवेदनाची प्रत दिली. ठाणेदार महल्ले विरुद्ध पत्रकार व जनतेचा रोष लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील 13 ऑक्टो. रोजी सायंकाळी वणी गाठून पत्रकारांची भेट घेतली.
वणी पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत अनेक तक्रारीनंतरही पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनी उपोषण करण्याच्या इशारा दिल्यानंतर ठाणेदार महल्ले याना रजेवर पाठविण्यात आले. तेव्हापासून वणी पोलीस स्टेशन प्रभारी ठाणेदारच्या भरवशावर आहे.
महल्ले अद्यापही आशेवर ?
दिवाळीपूर्वी वणीत नवीन ठाणेदाराची नेमणूक होण्याची अपेक्षा होती. मात्र ठाणेदार महल्ले यांचे ‘गॉड फादर’ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांची बदली झाली. येत्या आठड्यात वणी पोलीस स्टेशनला नवीन ठाणेदार मिळेल अशी चर्चा पोलीस विभागात सुरु आहे. दरम्यान महल्ले व त्यांच्या आधीचे ठाणेदार सोनटक्के हे देखील अद्यापही वणीच्या आशेवर असल्याची माहिती आहे. दरम्यान वणी हे मलईदार ठाणे असल्याने इतरांनीही यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.