अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव
शिंदोला येथील कपाशीच्या पिकात आढळल्या बोंडअळ्या
तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा मृग नक्षत्रात खरीप कपाशीची टोबणी आटोपली. योग्य वेळी लागवड, पाऊस, मशागत आणि व्यवस्थापन यामुळे सधःस्थितीत कपाशीचे पीक फुल, पात्यांवर आहे. मात्र, शिंदोला शिवारात कपाशी पिकांच्या अगदी प्रारंभीच्या अवस्थेत बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढून उत्पन्नात प्रचंड घट येण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.
वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कपाशीचे चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा होती. त्यामुळे पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांना खर्च करण्यास कुचराई केली नाही. मात्र, शिंदोला येथील रवींद्र पांगुळ यांच्या कपाशी पिकातील डोमकळ्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे प्रादुर्भावग्रस्त बोंड गळून पडत आहे.
कीटकनाशकांची फवारणी करूनही बोंडअळींचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. अलीकडील तीन, चार वर्षांपासून गुलाबी बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दरवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून सुरु होतो. शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. तथापि, यंदा कापूस पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. पिक वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.
बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे नुकसानाची भीती – शेतकरी
मी दि. 11 जून रोजी कपाशीची टोबणी केली. रसशोषक कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी केली आहे. रासायनिक खतांच्या दोन मात्रा दिल्या. निंदन, डवरणी करून शेत तणमुक्त ठेवले आहे. पिकांची अवस्था एकदम समाधानकारक होती. मात्र, दि. 30 जुलै रोजी शेतात पीक पाहणी करताना डोमकळ्यात गुलाबी बोंडअळ्या दिसून आल्या.
– रवींद्र पांगुळ, शेतकरी, शिंदोला
हे देखील वाचा:
मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार