वांजरी येथील शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी करा

मुख्याध्यापकांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप

0 2,463

जब्बार चीनी,वणी: जि. प. उच्च प्राथमिक शाळा वांजरी येथील कार्यरत मुख्याध्यापकांनी नियमबाह्यरित्या पैशाची उचल करून गैरव्यवहार केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. या संदर्भात गटशिक्षण अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे.

वांजरी येथे जि. प. उच्च प्राथमिक शाळा वांजरी येथे सुरेन्द्र दादाजी बोबडे हे मुख्याध्यापक म्हणून रुजू आहेत. 2019-20 या शैक्षणिक सत्रात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेला 50 हजार रूपयाचा निधी मिळाला. हा निधी खोटे बिल जोडून व काम नसताना या पैशाची उचल केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने निवेदनातून केला आहे. याशिवाय अध्यक्षांना चेक पाठवून धमकावणे व अरेरावीची भाषा वापरुन चेक वर सही करण्यास बाह्य करणे असाही आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात अत्यंत खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीत उर्वरीत शालेय पोषण आहार शासन परिपत्रकानुसार वाटप करायचा होता. मात्र त्याचे वाटप न करता शालेय पोषण आहारामधील तेल, डाळ, तांदुळ पिशवीत भरून घरी घेऊन गेल्याचाही आरोप यात आहे. याबाबत शाळा व्यवस्थापक समितीने वारंवार सूचना केल्यावर उर्मटपणे उत्तरे देण्यात आल्याचे म्हटले आहे.  ?याशिवाय शाळेकडील असलेली जमिनीचा (पळ ई वर्ग) लिलाव करण्यात आला. लिलावाची मुळ लिलाव रक्कम रू. 92 500, त्यापैकी रु. 57, 500 पासबुकामध्ये चेकव्दारे दाखविण्यात आली. उर्वरीत रक्कम रु.35, 000 लिलावकर्त्या कडून नगदी स्वरुपात घेऊन मुख्याध्यापकांनी परस्पर लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी पालकांना व गावातील नागरीकांना टि. सी. पाहीजे असल्यास ४०० ते ५०० रुपये लागतात असे सांगतात व वसुल करुन टि.सी. देतात. याची कसल्याही प्रकारची पावती दिली जात नाही अशा तोंडी तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीकडे आल्या आहेत. याबाबत विचारणा केल्यास उत्तर दिले जात नाही. डिजीटल शाळा वर्ग अनेक वर्षापासून पुर्णपणे बंद अवस्थेत आहे. डिजीटल वर्गाकरीता साहित्य खरेदी नविन घेतल्याचे व दुरूस्तीचे खोटे बिल समितीपुढे सादर करून मुख्याध्यापक पैशाची अफरातफर करतात. असा आरोप करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षाणापासून वंचित ठेवतात. वृत्तपत्र शाळेत येत नाही. मात्र त्याचे बिल मात्र समितीच्या सभेमध्ये सादर करतात. शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता कामे करतात व अध्यक्षांना पदावरून काढून टाकण्याची धमकी देतात. सदर मुख्याध्यापकाची चौकशी करून कार्रवाई न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रविण वैदय यांनी दिला आहे. निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष वंदना बारतीने, उपाध्यक्ष अनिता तेलतुंबडे सहीत अन्य सदस्य व पालक वर्गाच्या सहया आहेत.

Comments
Loading...