बहुगुणी डेस्क, वणी: नात्यांची गुंफण अत्यंत नाजूक असते. ती सांभाळण व जपणं म्हणजे तारेवरची कसरतच होय. मात्र या नात्यांमध्ये कधी वितुष्ट येऊन त्यांना तडा जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. एका छोट्याशा कारणावरून नजिकच्या मंदर येथे अशीच एक घटना घडली. साध्या गोष्टीवरून झालेला वाद विकोपाला गेला. त्यात काका, काकू व चुलत भावाने एका व्यक्तीस रविवार दिनांक 8 जून रोजी 7.40 वाजण्याच्या सुमारास तंटा केला. त्यात हाताच्या कड्याने मारल्यामुळे एक व्यक्ती जखमी झाली.
तक्रारीनुसार शेती करणारे फिर्यादी सचिन नवनाथ बुच्चे (33) नजिकच्या मंदर येथे राहतात. त्याच गावात त्यांचे काका चमाजी गणपत बुच्चे (55), काकू व चुलत भाऊ अनिकेत चमाजी बुच्चे (25) राहतात. रविवारी सचिन नवनाथ बुच्चे यांना त्यांच्या वरील नातेवाईकांनी घराच्या पायरीजवळ रोटावेटर का मारले असे विचारले. शब्दांवरून सुरू झालेला वाद हातघाईवर गेला. आरोपी अनिकेत चमाजी बुच्चे हा सचिन बुच्चे याच्याजवळ गेला. त्याच्या हातातील धातुच्या कड्याने त्याने सचिन बुच्चे यांच्या कानाच्या मागे वार केला. हाताबुक्यांनी मारहाण केल्यावर नंतर शिविगाळ करून धमकीही दिली.
मग हे प्रकरण वणी पोलीस ठाण्यात पोहचले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात कलम 118 (1), 115 (2),352,351 (2) (3) बि. एन. एस. अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास पोहेकॉ मारोती पाटील करत आहेत. नातेवाईकांचा हा अजब वाद सध्या गावात चर्चेचा विषय झाला आहे.
Comments are closed.