जितेंद्र कोठारी, वणी: क्रिकेट मॅच सट्टा प्रकरणी अटक झालेल्या एका बिल्डरसह चारही आरोपींना वणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
रविवार 10 जाने. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून क्रिकेट मॅचवर सट्टा खेळताना एका बिल्डरसह 4 आरोपीला अटक केली होती. पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळविण्यात आली होती.
गुरुवार 14 जाने. रोजी पोलीस कोठडीची मुदत संपून आरोपी जम्मू उर्फ जमीर मेहबूब खान, रियाज सत्तार शेख, एजाज अली ताहीर अली व मो.सहेफ मो.शब्बीर चिनी या सर्वांना कडक पोलीस बंदोबस्तात वणी न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये घेऊन यवतमाळ येथून अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे दुपारी 4 वाजता दरम्यान वणी ठाण्यात पोहचले. त्यानंतर 4.30 वाजता पोलीस कमांडोच्या सुरक्षेत चारही आरोपींना वणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव न्यायालयात हजर होते.
आरोपींना जामिन मिळणेकरीता त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. पोलिसांच्यावतीने सरकारी वकील यांनी आरोपींची पोलीस कोठडी दोन दिवस वाढविण्याची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडी न देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
तब्बल एका तासांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर मा. न्यायाधीशाने आरोपींना जामीन नाकारले. न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी देण्याची मागणीही फेटाळून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.