जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी 3 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी फुस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली होती. अखेर सदर मुलीचा शोध लागला असून दामले नगर येथील एका घरातून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. एका मजनूने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी ही नवीन वागदरा येथे आपल्या आई वडिलांसह राहते. पीडित मुलगी ही नवव्या वर्गात शिकते. 2 जुलै रोजी घरातील आतल्या खोलीत पीडित मुलगी ही तिच्या दोन बहिणीसह झोपली होती. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास मुलीची आई घरकामासाठी उठली. मात्र तिला सदर मुलगी खोलीत आढळून आली नाही. सकाळी मुलीच्या आई वडिलांनी नातेवाईक व शेजा-यांना याबाबत विचारपूस केली परंतु मुलगी आढळून आली नाही.
अखेर मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठले व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भांदविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करीत असताना मुलीच्या पालकांनी फूस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली होती.
एपीआय संदीप एकाडे हे या प्रकरणाचा तपास करीत होते. तपासादरम्यान त्यांना सदर अल्पवयीन मुलगी दामले ले आऊट येथील रहिवाशी असलेला मल्लेश नीलकुंटावार याच्यासोबत असल्याची माहिती मिळाली. घटनेच्या दिवसापासून तो देखील बेपत्ता होता. वणी पोलीस तेव्हापासून आरोपीच्या मागावर होते. मात्र तो तेलंगणात मुलीला घेऊन पळून गेला होता. शनिवारी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांना खब-याकडून पीडित मुलगी दामले ले आऊट येथील आरोपीच्या घरी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला. त्यात अल्पवयीन पीडित मुलगी आढळून आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले मात्र आरोपी आढळून आला नाही. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती दिली. तपासात आरोपीने मुलीवर लैंगिंक शोषण केल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अपहरणासह आरोपीवर भादंविच्या कलम 376 व बाल लैंगिक संरक्षण कायद्याच्या (पोस्को) कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल केला.
वणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय संदीप एकाडे, माया चाटसे या करीत आहे.
हे देखील वाचा:
मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
Comments are closed.