वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन
कृषी कायदे रद्द करण्याची मागणीसाठी जोरदार धरणे
जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या जाणाऱ्या कायद्यामुळे या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालून संविधानाचे रक्षण करावे. यासाठी “खेती बचाओ, लोकतंत्र बचाओ” हे देशव्यापी आंदोलन घेण्यात आले. वणीत देखील किसान सभेतर्फे शनिवारी 26 जून रोजी किसान सभा व माकपचे वतीने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन घेण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले.
देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे व भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे करून मोदींच्या भाजप सरकारने भारतीय जनतेला धोक्यात मारण्याचे षडयंत्र चालविले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी व युवकांच्या विरोधात धोरणे घेत संविधानिक तरतुदी विरोधात हुकूमशाही पद्धतीने राजकारभार सुरू आहे. भारत देशाच्या इतिहासात आणीबाणी पुन्हा एकदा लागून राजकारभार सुरू असल्याचे वातावरण आहे. ह्या सर्व प्रकारामुळे या देशात शेतकरी, कामगार, युवक व विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.
ह्याच अनुषंगाने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या 7 महिन्यापासून सातत्याने आंदोलन करीत असताना त्यांच्या सोबत कामगार, युवक व विद्यार्थी सहकार्य करीत आंदोलन करीत आहेत. आजच्या आंदोलनात सुद्धा संपुर्ण देशभरात विद्यार्थी, युवक, महिला उतरल्या आहेत. या आंदोलनाद्वारे राष्ट्रपती यांना निवेदन स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले आहे. वणी येथेही राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, रामभाऊ जिड्डेवार, नंदू बोबडे, मनोज काळे, आनंदराव पानघाटे, भास्कर भगत, दशरथ येनगंटीवार, तुकाराम भगत, ऋषी कुळमेथे, वैभव मजगवळी, गंगाराम मेश्राम आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष व युवकांनी सहभाग घेतला.
हे देखील वाचा:
[…] वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ क… […]