ज्योतिबा पोटे, मारेगाव: मैत्री म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ, असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नात श्रेष्ठ असतं. असा काहीसा अनुभव वणी व मारेगाव करांनी अनुभवला. अपघातग्रस्त नामदेवला त्याचा पाच मित्रांनी मदतीचा आधार देऊन रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं किंचितही कमी नसतं हे दाखवून दिलंय.
ही कहाणी आहे मारेगाव येथील व्यावसायिक दिनेश खुराना व त्याच्या वणी येथील पाच मित्रांची. आकाश अक्कलवार, प्रशांत कळसे, विकास चांदवडकर, अजय पिंपळकर असे यांचे नाव आहे.
सकाळी फिरायला जाण्याची अनेकांना सवय असते. हे पाचही युवक सकाळी फिरायला जायचे. नामदेव ही त्याच मार्गाने जायचा. नामदेव हा मनमिळावू स्वभावाचा असल्यानं त्याची या पाच मित्रांसोबत मैत्री जुळली. पण 31 जुलै हा दिवस त्याचासाठी दुःखद ठरला. रोजच्या प्रमाणे या दिवशीही ते फिरायला गेले. पण काळाने झड़प घातली एक अज्ञात दुचाकी वाहनाने नामदेव ला कोर्ट परिसरात उभे असताना मागून जोरदार धड़क दिली. नामदेव खाली पडला तितक्यात दुचाकी चालक पसार झाला
नामदेवच्या मित्रांनी नामदेवला लोढ़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं एक्सरे काढले. त्याच्या गुडघ्याचा त्रास पाहून डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे एमआइआर काढण्यास सांगितले. थोडा वेळ मित्र घबारले. घरचा जबाबदार व्यक्ती कोणी नसल्यामुळे त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा होता. तसंच हा खर्च करणार कोण हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा सर्व मित्र एकत्र आले आणि त्यांनी नामदेवची मदत करण्याचे ठरवले.
त्याला चंद्रपूरला हवण्यात आले. एमआईआर काढला तर त्याच्या पायाच्या गुडघा खराब झाल्याचे निदर्शनास आले. तो चालूच शकत नसल्याने डॉक्टरांनी त्यावर शत्रक्रिया करणे गरजेचे असल्याच्ये सांगितले. हे सर्व ऐकून सर्वच घाबरले. नामदेवची आर्थिक परस्थिती हालाकीची आहे. एका कापड दुकानात नोकरी करुन तो आपल्या संसाराचा गाडा हाकलतो. शिवाय त्याच्या लग्नालाही अवघे दोन महीने झाले होते.
त्याचा सुखाचा संसार सुरू असताना काळानं अचानक झडप घातली. सुखाचे दिवस दुःखात बदलले. पण या कठिण प्रसंगी मित्र त्याचा आधार बनले. त्याला चालविल्याशिवाय मागे हटायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. वेळ न घालविता यांनी सर्वांनी पैसे गोळा केले आणि नामदेवला यवतमाळला उपचारासाठी नेलं.
यवतमाळला गेल्यावरही प्रश्न काही सुटला नव्हता. डॉक्टरानी शस्त्रक्रिया करणे कठिण असल्याचे सांगून त्याला नागपुर येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्याचे सर्व मित्र व्यावसायिक आहे. पण स्वतःचा काही काळासाठी त्यांनी स्वतःच्या व्यवसायापेक्षा मैत्रीला अधिक किंमत दिली. त्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन त्याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.
नागपूर येथे नामदेवच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता काही दिवसांतच तो चालू शकेल अशी ग्वाही डॉक्टरांनी दिलीये. केवळ मित्र असल्यामुळे आज नामदेववर उपचार होऊ शकले आहे आणि या मित्रांमुळेच लवकरच चालू फिरू शकणार आहे. नामदेव आणि त्यांच्या मित्रांचा हा किस्सा मारेगाव आणि वणीमध्ये पोहोचायला जास्त वेळ लागला नाही. परिसरात नामदेवच्या पाचही मित्रांचं कौतुक होत आहे.