आसऱ्याला घेतला त्यांनी पळस, विजेच्या कहरानं तर केलाच कळस

तब्बल 22 बकऱ्या जागीच ठार, चारणारी व्यक्तीही झाली जखमी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अस्मानी अन् सुलतानी संकट आलं, की कुठं दाद मागायला जागाच उरत नाही. त्यातही निसर्गाच्या मनमर्जीनं जवळपास सर्वच हवालदिल झाले आहेत. कधी अंग पोळणारं ऊन, तर कधी आलेला अवकाळी पाऊस. याचाच फटका मारेगाव तालुक्यातील वरुड (नेत) येथील बकऱ्या पाळणाऱ्यांना बसला. रविवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 5.15च्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात अंदाजे दोन लाख रूपये किमतीच्या 22 बकऱ्या जागेवरच ठार झाल्यात. तर भारत तुकाराम गेडाम (56) जखमी झालेत.

वरुड (नेत) येथील भारत तुकाराम गेडाम हे नेहमीप्रमाणेच रविवारी बकऱ्या चारायला जवळच्याच एका शेतात गेलेत. मात्र संध्याकाळ होत असतानाच निसर्गानं आपलं वेगळंच रूप दाखवायला सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आलेत. विजांचा कडकडाटही सुरू झाला.भारत तुकाराम गेडाम बाजूलाच असलेल्या पळसाच्या झाडाखाली जाऊन उभे राहिलेत. तेवढ्यात वीज नेमकी त्याच पळसाच्या झाडावर कोसळली.

त्यामुळे क्षणार्धात झाडाखाली उभ्या असलेल्या 22 बकऱ्या व 2 बोकड जागीच ठार झालेत. भारत तुकाराम गेडाम यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या आपत्तीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.