जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका महिलेला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आज सकाळी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यातील 3 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एकाला जमानतीवर सोडण्यात आले आहे. दारू तस्करांवर दादागिरी व दहशतीमुळे त्रस्त झालेल्या मेंढोलीवासीयांनी पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मेंढोली येथे अवैध दारू विक्रीचा महापूर आला आहे. याबाबत अनेकदा पोलीस तक्रार करण्यात आल्या होत्या. अनेकदा महिलांनी मोर्चा देखील काढला. मात्र त्यावर तात्पुरती कार्यवाही व्हायची व त्यानंतर पुन्हा अवैधरित्या दारू विक्री सुरू व्हायची. यामुळे गावाताली सामाजिक स्वास्थ बिघडत चालले होते. याबाबत कुणी तक्रार केली किंवा हटकले असता दारू तस्कर लोकांना धमकवायचे. दारू तस्करांच्या वाढत्या गुंडगिरी व दादागिरीमुळे गावकरी प्रचंड दहशतीमध्ये आले होते.
काही दिवसांआधी गावातील काही महिलांनी मेंढोली गावातील अवैध दारूविक्रीबाबत एसपी ऑफीसला तक्रार केली. त्यावरून 20 ऑगस्ट रोजी शिरपूर पोलिसांनी गावात अवैध दारूविक्री विरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांनी या प्रकरणी काहींना ताब्यात देखील घेतले. दिनांक 20 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी विशाल भाऊराव चांदेकर (25), भाऊराव भानुदास चांदेकर (55), मयुर पुरुषोत्तम कावडे (25 व पुरुषोत्तम लक्ष्मण कावडे (45) हे चौघे जण तक्रार केल्याच्या रागातून लोखंडी रॉड घेऊन पीडित महिलेच्या घरी गेले. त्यांनी महिलेला दारु विक्रीची माहिती पोलिसांना का दिली असा जाब विचारत तिला लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच तिचा विनयभंग केला.
आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडितेचे केस ओढत तिला घराबाहेर आणले. तिथे आरोपी विशालने या महिलेनेच पोलिसांना माहिती दिली असे सांगत त्याच्या इतर साथीदारांना सर्वांसमोर महिलेला मारहाण करण्यास सांगितले. या झटापटी महिलेच्या हाताला जखम झाली. मारहाण बघून शेजारी व गावातील काही लोकांनी या चार नराधमांपासून महिलेची सुटका केली. दरम्यान विशाल चांदेकर याने पुन्हा पोलिसांना दारू विक्रीची खबर दिल्यास जीवे मारील अशी धमकीही महिलेला दिली.
दारु तस्करांच्या गुंडगिरीमुळे महिला प्रचंड घाबरली व तिने रात्रीच शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी सर्व आरोपीविरोधात भादंविच्या कलम 324, 354 (B), 452, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आज दुपारी पोलिसांना न्यायालयात हजर केले असता यातील तीन आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर भाऊराव चांदेकर याला जामीन दिला.
दहशत पसरवण्यासाठी काढला मारहाणीचा व्हिडीओ
गावात 5-6 अवैध दारू तस्कर आहेत. हे तस्कर गावात तसेच परिसरात दारूची अवैधरित्या विक्री करतात. दादागिरीच्या जोरावर निगरगट्ट झालेल्या दारू तस्करांनी अवैध दारू विक्रीचा सपाटा लावला होता. यापुढे कोणीही तक्रार करायला नको त्यामुळे दहशत पसरवण्याच्या उद्देशाने दारु तस्कराने महिलेला रॉडला मारहाण केली, तसेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी याचा व्हिडीओही काढला असल्याची माहिती आहे. मात्र गावक-यांनी या वेळी दारू तस्करांना अद्दल घडवण्याचे ठरवत महिलेला साथ दिली.
मेंढोली येथील अवैध दारू विक्री कधी बंद होणार?
मेंढोली येथील दारू तस्करीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून काही केल्या सुटत नाहीये. याबाबत गावातील महिलांनी सातत्याने निवेदन दिले, मोर्चा काढला, ठराव घेतला. यावर तात्पुरती कारवाई व्हायची. मात्र पुन्हा लगेच दारू विक्री सुरू व्हायची. दारूविक्रीला विरोध करणा-यांच्या अंगावर जाऊन पडणे, धमकावणे, दादागिरी करणे असे दारु तस्करांचे प्रकार कायमच गावात सुरू राहायचे. मात्र आता दारु तस्करांची मजल एका महिलेच्या अंगावर हात टाकण्यापर्यंत गेली. मात्र यावेळी दारू तस्करांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. पहिल्यांदाच आरोपींवर अशी मोठी कारवाई केली गेली. त्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करीत आहे. मात्र आता तरी मेंढोलीतील दारू तस्करी कायमची थांबणार की काही दिवसांनी पुन्हा सुरू होणार ? हे येत्या काही दिवसात कळेल.
हे देखील वाचा:
महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना
वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन
Comments are closed.