फुटलेल्या कोंबांनी जाळलीत शेतक-यांची स्वप्ने
मारेगाव तालुक्यातील शेतक-यांचे लाखोंचे नुकसान
नागेश रायपुरे, मारेगाव: बियाणांना कोंब येणं तसा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. मात्र शेतातील कापणीला आलेल्या पिकांना कोंब येणं हे संकटच. या सोयाबीन पिकांना फुटलेल्या कोंबांनी शेतकऱ्यांची स्वप्न जाळलीत. तालुक्यातील सगणापूर येथील सुनील विश्वनाथ वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीनच्या उभ्या पिकाला चक्क अंकुर / कोंब फुटले. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सगणापूर येथील शेतकरी वाघमारे यांच्याकडे सगणापूर शिवारात गट क्र. 64/2, 5 हे.01 आर इतकी शेतजमीन आहे. या हंगामात त्यांनी कपाशी व तूर मिळून 2 हे.01 आर.वर पेरणी केली. तर बूस्टर 335 या सोयाबीन पिकाची 3 हेक्टर क्षेत्रांवर पेरणी केली. बियाण्यांसह त्याने स्वप्नांचीही पेरणी केली.
पूर्वीच सततची नापिकी तर कधी वन्यप्राण्यांकडून पिकांचं नुकसान व्हायचं. त्यातच डोक्यावर कर्जाचे ओझे अशा आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी बांधव हतबल झाला. अशातच तालुक्यात पडत असलेल्या सततधार पावसाच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सगणापूर येथील सुनील वाघमारे यांच्या शेतात 3 हेक्टर क्षेत्रफळांवर पेरलेल्या सोयाबीनच्या पूर्ण उभ्या पिकावर चक्क कोंब फुटले. शेतकऱ्याचे जवळपास 3 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईची मदत मिळावी अशा आशयाची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने प्रशासनाकडे केली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)