मारेगाव तालुक्यात गुरांवर लंपी स्किन रोगाचे थैमान

पशुचिकित्सालयात पशुधनाची प्रचंड गर्दी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात जनावरांवर लंपी स्किनसारख्या आजाराने थैमान घातले आहे. कोरोना काळात जनावरांवर आलेल्या या साथीच्या आजारामुळे उपचारासाठी सर्वच पशुचिकित्सालयांत पशुपालक आणि पशुधनाची प्रचंड गर्दी उसळली आहे.

तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक असा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. शेतकरी, शेतमजुरांकडे किमान दोन, चार जनावरे पाळली जातात. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील मार्डी, चोपन, शिवणी, हिवरा, कानडा, वनोजासह अनेक गावांत या रोगाची लक्षणे आढळून आलीत.

गाय आणि बैलांच्या अंगावर काळ्या अथवा लाल रंगाचे गोलाकार चट्टे पडणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. तसेच काही जनावरांमध्ये डोळ्यांमधून व नाकांमधून स्राव जाणे सौम्यस्वरुपाचा ताप येणे, भूक मंदावणे ही लक्षणे आढळून आलीत.

प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरे, गाभण गायींमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. हा आजार चावणाऱ्या माशा, गोचीड, चिलटे इत्यादींपासून फैलावतो. बाधीत जनावरांच्या लाळीने चारा व पाण्यापासून संसर्गजन्य आजार फैलाव होण्याची दाट शक्यता पशुतज्ज्ञांनी वर्तविली. तसेच निरोगी जनावरे आणि बाधीत जनावरे यांच्या प्रत्यक्ष स्पर्शानेसुध्दा विषाणूजन्य या आजाराचा पादुर्भाव दिसून येत आहे.

ओलसर आणि दमट या साथ आजाराला पूरक वातावरण असल्याने हा आजार पावसाळ्यात आपले डोके वर काढतो. या साथ आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी गोठा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी 1 लिटर पाण्यात 40 मी.ली.करंज तेल, 40 मी.ली.निम तेल आणि 10 ग्राम साबणाचे मीश्रण तयार करून फवारणी करणे गरजेचे आहे.

असे दर तीन दिवस जनावरे व गोठा घरच्या घरी फवारल्यास ही साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. तसेच बाधीत जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे. साथ आजाराची ही साखळी तोडण्यासाठी सर्व पशुपालकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 पशुपालकांनी घाबरु नये

लंपीस्किन हा जनावरांमधील विषाणूजन्य चर्मरोग आहे. या रोगामध्ये जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. लक्षणानुसार उपचार केल्यास जनावरे 3-4 दिवसात पूर्णपणे बरी होतात. त्यामुळे पशुपालकांनी घाबरू नये. या साथ आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा.

बाधीत जनावरांवर उपचार करून घ्यावेत तसेच गोठ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीरण करुन या साथ रोगावर नियंत्रणासाठी सहकार्य करावे.

डॉ. गौरव बारसकर

पशूधन विकास अधिकारी

मारेगाव पंचायत समिती

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.