वेगाव येथील 6 आरोपींना 1 वर्ष कारावास व दंडाची शिक्षा

मारेगाव न्यायालयाचा निकाल

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीच्या वादावरून दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी व एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमधील दोन्ही पक्षातील 6 आरोपीना प्रथम श्रेणी न्यायाधीश मारेगाव यांनी 1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गोविंदा नीलकंठ निखाडे, गोपाल नीलकंठ निखाडे, नानाजी बापूराव निखाडे, अर्जुन केशव निखाडे, राजू बापूराव निखाडे, रुपेश अर्जुन निखाडे सर्व रा. वेगाव, ता. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार फिर्यादी व आरोपी दोन्ही एकमेकांचे चुलत भाऊ असून गावातील पडीत जमिनीवर जनावरे चारण्याच्या कारणावरून 7 सप्टेंबर 2016 मध्ये दोन्ही कुटुंबात वाद होऊन मारहाण झाली. याबाबत दोन्ही पक्षाने एकमेकांच्या विरोधात मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मारेगाव पोलिसांनी सदर प्रकरणाची तपास पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी व इतर साक्षदार, डॉक्टर, तपास अधिकारी यांचे पुरावे नोंदविण्यात आले. अंतिम युक्तिवादनंतर फिर्यादीचा व इतर साक्षीदाराचा पुरावा गृहीत धरून दिनांक 10 मे 2022 रोजी आरोपी गोविंदा नीलकंठ निखाडे, गोपाल नीलकंठ निखाडे, भा. द. वि. चे कलम 325, 34, अंतर्गत प्रत्येक आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने अधिक कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

आरोपी नानाजी बापूराव निखाडे, अर्जुन केशव निखाडे, राजू बापूराव निखाडे, रुपेश अर्जुन निखाडे यांना भा.द.वि. चे कलम 324, 34, अंतर्गत प्रत्येक आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड तसेच भा.द.वि. कलम 323 अंतर्गत एक वर्ष व कलम 506 (ii) अंतर्गत एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील चैताली एस. खांडरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी जमादार ढूमने यांनी सरकारी वकील यास सहकार्य केले.

Comments are closed.