पुरुषोत्तम नवघरे, वणी: आधुनिक जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यात वाढ झाली असली, तरी भावनिक नात्यांमध्ये कमतरता जाणवत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत स्वातंत्र्य कमी असले, तरी कुटुंबासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक त्याग हा मुख्य संस्कार होता, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांनी केले. ते वणी येथील नगर वाचनालयात विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझा गाव माझा वक्ता’ या व्याख्यानमालेच्या 48व्या पुष्पात ‘वर्तमानातील कुटुंब संरचनेतील परिवर्तन’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका डॉ. राणानुर सिद्दिकी उपस्थित होत्या.
प्राचार्य वनकर यांनी सांगितले की, भारतातील कुटुंबे पूर्वी संयुक्त स्वरूपाची होती. धर्म, परंपरा, शेतीप्रधान अर्थव्यवस्था आणि एकत्र राहण्याची गरज यामुळे संयुक्त कुटुंबांना बळ मिळाले. मात्र, 19व्या शतकापासून शिक्षण, औद्योगीकरण, इंग्रजी शासन आणि समाजसुधारकांच्या चळवळींमुळे कुटुंब संरचनेत बदल घडू लागले. औद्योगिक क्रांतीमुळे लोक गावातून शहराकडे स्थलांतरित झाले, ज्यामुळे संयुक्त कुटुंबे तुटली. शिक्षणामुळे स्त्रियांना नवीन संधी मिळाल्या, पुरुषप्रधान वर्चस्व कमी झाले आणि स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल सुरू झाली.
संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा आणि नातेवाइकांमुळे मुलांचे संगोपन सुदृढ होत असे. आता एकल कुटुंबांमुळे वृद्धांचा सहवास मुलांना मिळत नाही, त्यामुळे डे-केअर आणि प्ले स्कूल्सवर अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम मूल्ये, संस्कार आणि सामूहिक जबाबदारीवर होत आहे. आज कुटुंबांचा कल व्यक्तीवाद, स्वातंत्र्य आणि करिअरकडे दिसतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांनी कुटुंब संरचनेतील बदलांचा आढावा घेताना प्रेम आणि त्याग हा कोणत्याही कुटुंबाचा पाया असल्याचे सांगितले. त्यांनी कुटुंबातील हे मूल्य अबाधित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजीत अणे यांनी केले. आभार अशोक सोनटक्के यांनी मानले.



Comments are closed.