मारेगाव नगरपंचायत: इच्छुकांची पक्षाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

आज नामांकन भरण्याची अंतिम तारिख, अपक्ष वाढवू शकते डोकेदुखी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उर्वरीत तीन प्रभागासाठीची निवडणूक 18 जानेवारीला होऊ घातलेली आहे. त्यासाठी नामांकन भरण्याची अंतीम तारीख आज 3 जानेवारी रोजी आहे. त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमेदवार कोण यावरच पक्षांचे निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहेत. शिवाय अपक्ष उमेदवारही पक्षाची डोकेदुखी वाढवू शकते.

आज नामांकन भरण्याची अंतिम तारिख आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार जवळपास ठरलेले आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बदललेले समीकरण आणि जातनिहाय मतदान यामुळे सर्वच पक्ष आपले उमेदवार कसे स्ट्रॉंग राहील याकडे लक्ष देत आहेत. प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 14 या तीन प्रभागासाठी उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. सीट आपल्यालाच मिळावी यासाठी उमेदवार आपल्या पक्षनेतृत्वाकडे गळ लावून बसले होते. मात्र पक्षश्रेष्ठी नेमका चेंडू कोणाच्या पदरात टाकणार हे आज स्पष्ट होणार आहेत.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेना आणि भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आणि इतर पक्ष कोणती राजकीय खेळी खेळतात यावरही काही गणितं अवलंबून राहील. परंतु प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपची ठरलेली उमेदवारीही बदलली जाऊ शकते अशीही चर्चा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि सेनेचे उमेदवारी जवळपास निश्चित आहे.

काँग्रेस पक्षाकडे दावेदारी वाढल्याने काँग्रेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. मनसे येथे उमेदवाराच्या शोधात आहेत. तर शहर विकास आघाडीकडून उमेदवार ठरलेला आहे. अशातच आता अपक्ष कोण आणि किती उमेदवार उभे राहतात यावर उमेदवारांच्या विजयाचे गणीत अवलंबून राहणार आहे.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरलेले आहे अशी चर्चा आहे. भाजप येथे ठरलेला उमेदवार बदलण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही. येथे मनसे आणि वंचित आघाडी काय भूमिका घेते यावरच या प्रभागाचे गणित अवलंबून आहे.

हे देखील वाचा:

वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 48 वर्ष पूर्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.