बोंडअळीग्रस्त झाडे घेऊन शेतकरी धडकले तहसिलवर
नरेंद्र ठाकरेंचे अळीग्रस्त झाड देऊन करणार होते स्वागत
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपासीचे झाडे घेऊन थेट मारेगाव तहसील कार्यालय गाठले. गुलाबी अळीने नुकसान झाल्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत गुरुवारी शेतक-यांनी तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन सादर केले.
मौजे करणवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीमुळे ९०% पिकांचे नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीला बियाणे कंपणी जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुलाबी अळींच्या प्रकोपाने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असले तरी शासनाला अद्याप जाग आली नाही. येथील शेतकरी नेते लक्ष देत नसल्याचा आरोप करणवाडी येथील शेतकरी करीत आहे
बोंडअळीग्रस्त झाडे देऊन नरेंद्र ठाकरेंना देणार होते शुभेच्छा
कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पणन महासंघाचे संचालक नरेंद्र ठाकरे यांच्या बुधवारी वाढदिवस झाला. त्यामुळे शेतकरी त्यांना गुलाबी बोंडअळी ग्रस्त कपासीचे झाड देऊन शुभेच्छा व निवेदन सादर करणार होते. परंतु शेतकऱ्यांनी बराच वेळ वाट पाहुनही नरेंद्र ठाकरे मारेगावात न मिळाल्याने शेतक-यांनी शेवटी तहसिलदारांना निवेदन दिले आणि आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.
नरेंद्र ठाकरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे. तसंच ते पणन महासंघाचे संचालक देखील आहे. यासोबतच शेतक-यांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. शेतक-यांच्या त्यांच्याकडून अजूनही आशा आहे. मात्र एवढं असूनही ते शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी अखेर त्यांनाच बोंडअळीग्रस्त झाडे देऊन शुभेच्छा देण्याचं ठरवलं.
गेल्या महिण्यापासून विरोधीपक्षाचे नेते गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत मिळावी म्हणून निवेदन सादर करुन स्वतःची प्रसिद्धी करत आहे. या गंभीर प्रश्नावर एकही विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ताधा-यांना किंवा प्रशासनाला हादरवून ठेवावं असं वाटलं नाही. विरोधी पक्षाचे नेते कुचकामी ठरत आहेत. तर सत्ताधारी सत्तेच्या माजात मस्तवाल झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना वालीच उरलेला नाही. या सर्व कारणाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
निवेदन देते वेळी करणवाडी येथील शेतकरी काशिनाथ खडसे, श्रीधर काळे, विनोद अवताडे, नाना जिवतोडे, संजय बोढे, शशिकांत बोढे, अरूंद अवताडे, अशोक गायकवाड, भास्कर गुहे, अमोल पांडे, रवींद्र गारघाटे, देवराव नित, राजेंद्र खडसे, अक्षय ताजने, गणेश खडसे, रामकृष्ण जिवतोडे, संतोष कोंडेकर व इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.