मेंढोली येथील महिलेला शेतात झाला सर्पदंश
मेंढोली येथे आठवड्यात सर्पदंश होण्याची सलग तिसरी घटना, उपचार सुरू, प्रकृती स्थिर
तालुका प्रतिनिधी, वणी: शेतात कपाशीचे निंदण करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाला. ही घटना दि. 12 शनिवारी दुपारच्या सुमारास मेंढोली येथे घडली. सदर महिलेवर वणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. नीलिमा रवींद्र उपासे (28) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढोली येथे आठवड्यात सर्पदंश होण्याची सलग तिसरी घटना आहे.
उपासे यांच्या शेतात कपाशीचे निंदण करण्याचे काम सुरू होते. यावेळी तिच्यासोबत मजूर महिला होत्या. दुपारी दोन वाजताच्या दरम्यान निंदण करताना नीलिमाच्या हाताला साप चावला. तिला त्वरित वणीच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्रकृती स्थिर आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत शेतशिवारात शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होणे, वीज पडणे, विजेचा झटका बसणे, सर्पदंश होणे आदी प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. ग्रामीण भागातील शेत वहिवाटीच्या पांदण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली असते. परिणामी फवारताना विषबाधा झालेल्या व्यक्तीला, सर्पदंश झालेल्यांना किंवा कोणत्याही दुर्घटनेत गंभीर झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होतो. अनेकांना वेळेवर उपचार मिळू शकत न शकल्याने प्राणहानी होते. मात्र शासन, प्रशासनाकडून पांदण रस्ते विकासाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.