जीव देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नेले पळवून

अमरावती जिल्ह्यातून आरोपीला अटक, अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर 15 दिवस सातत्याने अत्याचार करणा-या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून मुलगी व आरोपी या दोघांनाही पोलिसांनी परत आणले. रात्री आरोपीवर पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

तक्रारीनुसार, आरोपी अजय गणेश मेश्राम (वय 20) हा मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील रहिवाशी आहे. त्याने काही दिवसाआधी शेजारी असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मुलीने लग्नास नकार दिला. दरम्यान आरोपीने तू माझ्यासोबत चल, आपण लग्न करू अन्यथा मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल अशी धमकी मुलीला दिली.

आरोपीची धमकी ऐकून मुलगी घाबरली. आरोपी अजय याने फूस लावली व मुलीला दि.16 ऑगस्टला रात्री घरचे सर्व जण झोपल्यावर पळवून नेले. मुलीला पळवून नेल्याचे कळताच मुलींच्या पालकांनी दुस-या दिवशी म्हणजे दि. 17 ऑगस्टला मारेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

आरोपीने मुलीला पळवून बाहेरगावी नेले. तिथे त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर दुसरीकडे मारेगाव पोलीस आरोपीच्या शोधात होते. अखेर पोलिसांना आरोपी व मुलगी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवळा येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी अजय गणेश मेश्राम (वय 20) याला शुक्रवारी दुपारी अटक केली.

मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम 366 (अ), 376, 376 (1) (ए), 376 (2) (जे)(एन) 506 सह पोक्सो अंतर्गत (बाल लैंगिक अत्याचार) कलम 4, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

वणीत रंगणार T-10 चा थरार… 8 सप्टेंबर रोजी खेळाडुंचा लिलाव

पूरग्रस्त गावातील गरजूंना धान्याच्या कीट व ब्लँकेटचे वाटप

 

Comments are closed.