ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं. लिखित आश्वासन दिल्यानंतर मनसेनं पुकारलेला मारेगाव बंद देखील स्थगित करण्यात आला आहे.
मारेगाव शहरातील मार्डी चौकामध्ये 16 ऑगस्टपासून मनसेचे पाच कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले होते. ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरून रुग्णांना योग्य सेवा द्यावी, अशा वैद्यकिय सेवेसंबंधी विविध मागण्या घेऊन मनसेनं प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला होता. उपोषणाच्या तिस-या दिवशी आंदोलन तीव्र करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी आंदोलन आणखी तीव्र करत मारेगाव बंदची हाक दिली होती.
आंदोलन तीव्र झाले हे लक्षात येताच आरोग्य विभाग नरमलं. आरोग्य विभागाने मारेगाव येथे रोटेशन पद्धतीने दहा वैद्यकीय अधिकारी, तर 24 तासाला दोन वैद्यकीय अधिकारी यांची तात्पुरती नियुक्ती, तर दहा दिवसांनी 29 ऑगस्ट पर्यंत कायम स्वरूपी डॉक्टराची नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन दिले. हे पत्र तहसिलदार मार्फत उपोषणकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर तहसिलदार मारेगाव यांनी उपोषणकर्त्यांना ज्युस पाजुन त्यांचं उपोषण सोडवलं.
(हे पण वाचा: धक्कादायक ! शेतकरी सन्मान योजनेच्या यंत्रणेत नायगाव सोसायटी बेपत्ता)
बंदच्या हाकेमुळे सकाळपासूनच मारेगावातील वातावरण गरम होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं कठोर बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपोषण मंडपात मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रमेश सोनुले, शहर अध्यक्ष श्रीकांत सांबजवार, रोशन शिंदे, किशोर मानकर व शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानं अखेर मनसेनं उपोषण मागे घेतलं. पण प्रशासनाचं आश्वासन जर हवेत विरलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.