माहेरी बाळंपणासाठी आलेल्या आईची गळफास घेऊन आत्महत्या

राजूर येथील घटना, परिसरात हळहळ

विवेक तोटेवार, वणी: बाळंपणासाठी माहेरी आलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज राजूर येथे उघडकीस आली. गौतमी मनोहर ताकसांडे असे मृत महिलेचे नाव आहे. 15 दिवसांआधीच गौतमीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे संपूर्ण राजूर कॉलरीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गौतमी शामराव साखरकर (वय 38) ही राजूर येथील रहिवाशी होती. तिचे 12 वर्षांआधी केळापूर तालुक्यातील उमरी पाथरी येथील रहिवाशी असलेल्या मनोहर ताकसांडे यांच्यासोबत विवाह झाला होता. तब्बल 12 वर्षानंतर गौतमी ही गर्भवती राहिली होती. त्यामुळे बाळंपणासाठी ती माहेरी राजूर येथे आली होती. 29 जानेवारीला गौतमीने एका मुलीला जन्म दिला.

आज गुरुवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तिचे आईवडील एका खोलीत झोपले होते. ही संधी साधून गौतमीने मागच्या खोलीत जाऊन टिनाच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने बाळ रडू लागले. बराच वेळ बाळ रडत होते मात्र त्याकडे तिच्या आईचे लक्ष नसल्याने बाळाची आजी मागच्या खोलीत गेली असता तिथे तिला गौतमीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

राजूर कॉलरीत हळहळ
गौतमीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अवघ्या 13 दिवसांआधी गौतमीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.