पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी वणी यांच्यावतीने पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जागतिक मृदादिनानिमित्त राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, जमीन आरोग्यपत्रिका अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. मौजा विठ्ठलनगर विरकुंड येथे बाबाराव डांगे यांच्या शेतात हे शेतकरी प्रशिक्षण झाले.
शेतकरी प्रशिक्षणामध्ये वणी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी जागतिक मृदादिनाचे महत्त्व, माती नमुना कसा घ्यावा, माती नमुना तपासणीचे फायदे, माती नमुना तपासणी अहवालानुसार खत व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धम्मपाल बन्सोड, यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्याकरिता जैविक, कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर, शेतातील काळी कचरा – पाला पाचोळ्यापासून कंपोस्ट खत बनविणे व बियाण्याला जैविक खताची बीजप्रक्रिया करण्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सहायक प्रकाश खोब्रागडे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुढील वर्षी गुलाबी बोडअळीच्या नियंत्रणाकरिता कपाशी पिकाची फरदड न घेणे व डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी पिक शेतातून काढून टाकून अवशेष नष्ट करणे, रब्बी पिकांचे व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मंचावर भगवान चटप, तात्याजी पारखी यांसह गावातील शेतकरी सामजिक अंतर ठेऊन उपस्थित होते. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शेतकरीमित्र प्रकाश डाहुले व नीळकंठ पिंपळकर यांनी परीश्रम घेतले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा