घरगुती नळ कनेक्शनचा अहवाल दाखवून व्यावसायिकाला कनेक्शन

जलपुर्ती विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर, चौकशी करण्याची पीके टोगे यांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: नळ कनेक्शनचा खोटा अहवाल देऊन नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडवले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पी के टोंगे यांनी केला आहे. घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नळ कनेक्शनचे वेगवेगळे दर आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी घेण्यात येणा-या नळ कनेक्शनसाठी घरगुती वापराचे कनेक्शन असल्याचा अहवाल दिल्याचे नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पी के टोंगे यांनी केली आहे.

Podar School 2025

नगर परिषदेच्या जलपुर्ती विभागातील एका शिपायाकडे नागरीकांना नळ कनेक्शन देण्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे काम दिले आहे. नळ कनेक्शन देते वेळी घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी, बांधकामासाठी, व्यवसायिक याप्रमाणे अहवाल सादर करावा लागतो. सोबतच नळ कनेक्शन देताना कच्चा रस्ता, डांबरी रस्ता किंवा कॉंक्रीट रस्त्याची कटींग होत असल्यास तसा अहवाल सादर करावा लागतो. यासाठी फुटाप्रमाणे दर आकारले जाते. मात्र हा रोड अहवालातून कधी गायब करून तर कधी रस्त्याची लांबी कमी करून अहवाल दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील ओम नगर येथील एका व्यावसायिकाला व्यावसायिक वापराच्या नळ कनेक्शन ऐवजी घरगुती वापराच्या नळ कनेक्शनचा खोटा अहवाल दिल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती नळ कनेक्शनसाठी फक्त 2375 रुपयांची डिमांड आहे. मात्र सदर व्यावसायिकाला 17000 रुपयांची डिमांड आहे. घरगुती वापरासाठी 2400 रुपये तर व्यावसायिक वापरासाठी वार्षिक कर 12 हजार रुपये आहे. त्यामुळे नगर पालिकेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक पी के टोंगे यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार तथा प्रशासक व मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांना निवेदन देण्यात आले आहे.

पालिकेचा कारभार राम भरोसे !
वणी नगर पालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने सध्या पालिकेचा कारभार प्रशासक सांभाळत आहे. शहराची लोकसंख्या आणि विस्तार पाहता नगर परिषद हद्दीत काय कारभार सुरू आहे याची माहिती प्रशासकांना लागत नाही. याचाच फायदा काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन नगर परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे. जर यावर कार्यवाही झाली तरच नगरपालिकेची महसूल चोरी थांबवली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया सध्या वणीकरांतून व्यक्त होत आहे. 

हे देखील वाचा:

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

Comments are closed.