खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली रंगतदार

मिटिंगमध्ये वाद, निवडणूक झाली रंगतदार ! जय विकास पॅनल व परिवर्तन पॅनल आमनेसामने

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी 7 जून रोजी वणी प्रक्षेत्र खासगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होणार आहे. जय विकास पॅनल व परिवर्तन असे दोन पॅनल या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. सध्या आरोप प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीने चांगलेच लक्ष वेधले आहे. जय विकास पॅनल छत्री तर परिवर्तन पॅनल विमान हे बोधचिन्ह घेऊन निवडणूक लढत आहे. निवडणुकीत तारीख जवळ येताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीला सुरुवात झाली आहे. या संस्थेद्वारा वरोरा रोड येथे पतसंस्था असून खासगी शालेय कर्मचा-यांमध्ये ही पतसंस्था चांगलीच लोकप्रिय आहे.

मिटिंगमध्ये वाद, निवडणूक झाली रंगतदार !
या पतसंस्थेत 160 सदस्य आहेत. दिनांक 1 मे रोजी सभासदांची वार्षीक सभा झाली. यात आगामी पंचवार्षीक निवडणूक अविरोध करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अविरोध निवडणुकीसाठी सुमारे 100 सदस्यांनी सहमती दर्शवली. तसेच त्यासाठी 11 जणांचे संचालक मंडळ सर्वानुमते निवडण्यात आले. मात्र निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याच्या वेळी आपसी सहमतीत ‘बिघाडा’ झाला. यातील काही जणांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अविरोध होणा-या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले व निवडणुकीला रंग चढला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जयविकास पॅनलचे बोधचिन्ह छत्री असून या पॅनलची धुरा मनोज वरारकर, रमेश टेमुर्डे, दौलत घुगुल इत्यादींच्या खांद्यावर आहे. तर परिवर्तन पॅनलचे बोधचिन्ह विमान असून याची धुरा प्रा. सुधीर वटे, शाम बोढे इत्यादींच्या खांद्यावर आहे. निवडणूक जवळ येताच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. विमानाच्या इंधनात भ्रष्टाचाराचे ऑईल मिसळले असल्याचा आरोप करीत छत्री हेच स्वच्छ प्रशासनाची सावली देणार, असा दावा जय विकास पॅनलतर्फे करण्यात आला आहे. 

जय विकास पॅनलतर्फे सर्वसाधारण प्रवर्गातून जय विकास पॅनलतर्फे संतोष वसंतराव चिल्कावार, नत्थू मारोती जेऊरकर, आत्माराम नारायण ताजणे, राजेंद्र नथ्थूजी देवतळे, प्रकाश देवराव देवाळकर, अरुण नारायणराव पहुरकर तर ओबीसी प्रवर्गातून भुपेंद्र पांडुरंग देरकर, अनु जाती जमाती प्रवर्गातून अरविंद उद्धवराव तिरणकर, विजा प्रवर्गातून विनोद पुंडलिक बुच्चे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अश्विनी तानाजी टेकाम व गाथा विजयराव पिपराडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मिटिंगमध्ये अविरोध निवड करण्यात आलेल्या सदस्यांपैकी 8 उमेदवार हे जय विकास पॅनलकडे आहेत. त्यामुळे याला परिवर्तन पॅनल कसे तोंड देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Comments are closed.