बसमुळे नवरगाव परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

पालकमंत्र्यांच्या पत्राला महामंडळाने दाखविली केराची टोपली

0

रवि ढुमणे, वणी: वणी आगारच्या मानव विकास मिशन ची बस सेवा ठप्प करण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. याबाबत पालकांनी पालकमंत्री यांना निवेदन सादर केले. त्यावर पालकमंत्र्यांनी महामंडळाला ब सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र एसटी महामंडळाने पालकमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपलीच दाखवीत बस सेवा सुरूच केली नाही. तर दुसरीकडे शासन एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहायला नको यासाठी शिक्षकांना तगादा लावत आहे मात्र शासन सोई उपलब्ध करून देण्यात इथे कमी पडल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे पंचशील माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात परिसरातील गोधणी, अर्जुनी, हिवरी, सगणापूर, रायपूर आदी गावातील मुले शिकायला येतात. शासनाने विद्यार्थ्यांसाठी मानव विकास च्या माध्यमातून बस सेवा सुरू केलीय. परंतु सध्या ही सेवाच ठप्प करण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सायकल, पायदळ वेळप्रसंगी मिळेल ते वाहन इतकेच नव्हे तर बैलगाडीतून सुद्धा शाळेत यावे लागत आहे. यात शाळेत यायला खूप उशीर होतो. शिकवणी सुरू झाल्याने अभ्यास सुद्धा मागे पडतो. पालकांनी याबाबत खूपदा पाठपुरावा केला होता. मात्र बस सेवा सुरू करण्यात आली नाही. शेवटी पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यावर पालकमंत्री मदन येरावार यांनी विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ यांना 12 ऑक्टोबर ला बस सुरू करण्यासंबंधीचे पत्र दिले. परंतु महामंडळाने पालकमंत्री येरावार यांच्या पत्राला केराची टोपलीच दाखविली.

परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षापासुन परिसरातील विद्यार्थी सायकल पायदळ येऊन शिक्षण घेत आहे. याहून शासनाचे अच्छे दिन कोणते असेल असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवण्यासाठीच हे षडयंत्र तर नसेल ना? अशी शंका उपस्थित केल्या जात आहे. एकूणच गेल्या दोन वर्षांपासून मानव विकास ची बससेवा ठप्प असल्याने विद्यार्थी मरणयातना भोगतांना दिसत आहे.

शासनाचा दुटप्पीपणा

एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहायला नको म्हणून शिक्षकांना गावात तसेच घराघरातील दार ठोठावून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यासाठी आणायला तगादा लावत आहे. तर दुसरीकडे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मुलांना शाळेत येण्यासाठी सोय ही उपलब्ध करून दिली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी पायपीट करून नवरगाव येथील शाळेत ऊन, वारा, पावसात न चुकता येतात मात्र शासन त्यांना सोई उपलब्ध करून देण्यात पुरते अपयशी ठरले आहे. परंतु या प्रकाराचे खापर शिक्षकावर फोडायला शासनाचे प्रतिनिधी मागेपुढे बघणार नाही.

वारंवार निवेदने तक्रारी देऊन सुद्धा शासनाचे प्रतिनिधीच कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. तर गावपुढारी केवळ पुढारपणात व्यस्त आहे. मारेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना याबाबत कोणीच उठाव घेतांना दिसत नाही हीच खरी शोकांतिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.