नागेश रायपुरे, मारेगाव: ऑनलाईन कर्ज देतो असे सांगत मारेगाव येथील एका युवकाची 100,165/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनवीर रजा शेख मुबारक (21) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अलिकडे ऑनलाईऩ पाकिटमारांनी लिंक पाठवून गंडा घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यातच वणीतील एका तरुणाला कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रसंगवधानाने तो त्यातून बचावला. मात्र मारेगाव येथील तरुणाच्या खिशाला तब्बल एक लाखांपेक्षा अधिकची चोट बसली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे तनवीर हा आर्थिक अडचणीत होता. दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्या 5.14 वाजताच्या दरम्यान तनविरच्या मोबाईलवर “लोन टॅब” असा मॅसेज आला. त्याने ती लिंक ओपन करून बघितले असता त्यात हिंदी भाषेत प्रधानमंत्री रोजगार योजने अंतर्गत 4 % व्याजदर, तसेच 35% सवलतीवर 1 लाख ते 50 लाखांपर्यंतचे लोन प्राप्त करा असा मॅसेज आला होता. शिवाय अधिक माहितीसाठी मो. क्र. 9627285666 या हेल्पलाईनवर संपर्क साधा असे आवाहनही करण्यात आले होते.
तनवीरला पैशाची गरज असल्याने त्याने कोणताच विचार न करता 9627285666 या हेल्प लाईन वर कॉल केला. त्या नंबरवर वरूण कुमार नावाचा इसम तनवीरशी बोलला. त्याने दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगितले. वरुणने त्याला कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने व्हाट्सउपवर कर्जाला आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे पाठवण्यास सांगितले. तसेच प्रोसेसिंग फि म्हणून 2650 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच ही प्रोसेसिंग फि परत मिळणार अशीही बतावणी केली.
दिनांक 3 ऑक्टोबरला तनवीरने 2650/- रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान वरूण कुमार या व्यक्तीने 4 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर भामट्याने वारंवार प्रोसेसिंग फिसची मागणी केली. त्याच्या जाळ्यात पुरता अडकलेल्या तनवीरनेही वारंवार ती पाठवली. दि. 6 ऑक्टोबरला 15,975/-, त्यानंतर दि.7 ऑक्टोबरला 37,700/-, दि. 8 ऑक्टोबरला 15140/-, 16000/- 12,700/- असे एकूण 100,165/- रुपये तनवीर नी ऑनलाईन पाठवले. चार लाखांचे लोन तसेच प्रोसेसिंग फि परत मिळणार हे सांगितल्याने तनवीरनेही त्याच्यावर विश्वास ठेवून वारंवार प्रोसेसिंग फिस पाठवली.
बँकेत कोरोना पॉजिटिव्ह निघाला…!
मागितले तेवढे पैसे पाठवल्यानंतर लोन मिळेल या आशेवर तनवीर होता. मात्र आता भामटा वरुण याने रंग दाखवण्यास सुरूवात केली. त्याने दिवसभर तनवीरचे कॉल उचलण्यास टाळाटाळ केली. दुस-या दिवशी तनवीरने पुन्हा क़ेला असता बॅंकेत कोरोना रुग्ण आढळल्याने बॅंक 14 दिवस बंद असल्याचे सांगितले. सततच्या टाळाटाळ करण्याने तनवीरला आता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर शनिवारी त्याने मारेगाव पोलीस स्टेशन गाठून ऑनलाईन पाकिटमार वरुण कुमार यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.
आधी केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित असणारे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार आता वणी सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहेत. एटीएम एक्सपायर होत आहे किंवा आपल्याला गिफ्ट मिळाले आहे असे ऑनलाईन पाकीटमारिचे फंडे वापरल्यानंतर आता सायबर गुन्हेगारांनी कॅशबॅक तसेच लोन मिळाल्याची बतावणी करून गंडा घालण्यास सुरूवात केली आहे. तीन दिवसांआधीच वणी बहुगुणीने परिसरात ऑनलाईन पाकीटमारीसाठी कॉल येणे सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. अशा फेक कॉल आणि इन्सटंट लोनपासून सावध राहण्याचे आवाहन वणी बहुगुणीतर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा… कॅशबॅकच्या नावाखाली परिसरात अनेकांना फेक कॉल