बहुगुणी डेस्क, वणी: आपला धंदा चालावा, यासाठी लोक कोणत्याही पातळीवर जातात. शाळा परिसराच्या काही मीटर अंतरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. तरीदेखील शहरातील इंदिरा चौकातील एका शाळेसमोर एकानं आपल्या साथिदारासह पानटपी व कॅरम बोर्ड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्थाचालकाच्या विरोधामुळं त्यांना यश मिळत नव्हतं. अखेर आरोपी व त्याच्या सहकाऱ्यानं शिक्षकालाच अॅट्रोसिटी कायद्यात अडकवण्याचा कट रचला. मात्र तो सपशेल फोल ठरत, डाव त्यांच्यावरच उलटला.
प्राप्त माहितीनुसार शिक्षकाने जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार वणी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र चौकशीअंती ती तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसा अहवाल वणी पोलिसांनी पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला असून, त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. येथील विशाल खांदनकर हे इंदिरा चौक, वणी येथे ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूलचे केंद्र संचालक असून, स्वतःच्या इमारतीत शाळा चालवितात. काही दिवसांअगोदर संग्राम गेडाम व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका मृत व्यक्तीच्या जागेवर अतिक्रमण करून तेथे पानटपरी व कॅरम बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला. हे शेड शाळेच्या अगदी समोर असल्यामुळे खांदनकर व परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध केला. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थविक्री करता येत नाही, असा नियम आहे. पानटपरीला नागरिकांचा विरोध होता.
संग्राम गेडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी खांदनकर यांना शाळा बंद करण्याच्या धमक्या दिल्या. २५ मार्चला खांदनकर यांना अॅट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या हेतूने जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार संग्रामने पोलिसांत दिली.त्यात सहकारी मित्रांनी आपल्याच घरातील महिला, मुलगा व एका सलून व्यावसायिकास साक्षीदार म्हणून तक्रारीत नमूद केले. या सर्व प्रकरणाची चौकशी एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी केली असता, त्यांना कुठलेही तथ्य आढळून आले नाही. चौकशीअंती तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे हा अहवाल पांढरकवडा येथील न्यायालयात सादर केला. विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी तपासणी करून या अहवालाला मंजुरी दिली.
Comments are closed.