पुन्हा विकतच्याच पाण्यावर जगत आहेत वणीकर

तीन ते पाच दिवसांतून केवळ एकदाच मिळतंय पाणी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेकडून तीन ते पाच दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होतो. एक तास आलेल्या नळाच्या पाण्यावर पुढील दिवस काढावे लागतात. त्यामुळे नागरिकांना पैसे मोजून पाण्याचा टँकर मागवून आपली तहान भागवावी लागत आहे. या वाढत्या भीषण पाणीटंचाईमुळे वणीकर जनता हैरान झाली आहे. 

वणी नगर परिषदेकडून 3 वर्षांपूर्वी 1500 रूपये वार्षिक पाणीकर घेतला जात होता. त्यानंतर पाणीकरात वाढ करून तो 2500 रुपये वार्षिक करण्यात आला. त्यानंतर पुन्हा पाणीकरात वाढ केली. आता पाणीकर तब्बल 3,000 रुपये आकारण्यात येत आहे. मात्र नळाद्वारे पाणीपुरवठा केवळ 3 ते 5 दिवसांत एकदाच आणि तोही फक्त 1 तास होतो. नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याच्या तक्रारीही केल्यात. परंतु त्यावर काहीही उपाययोजना झाल्या नाहीत. शहराला रांगणा इथून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी मोठी पाईपलाइन टाकण्यात आली आहे. परंतु वणीकर जनतेची तहान भागात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पाणी सोडण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही. रात्री-बेरात्री तर कधी भल्या पहाटेच नळ येतात. जनतेला रात्रभर जागं राहून पाणी आलं का म्हणून तपासणी करावी लागते. अनेक नागरिक तर जाग आली तेव्हा उठून नळ आलेत काय, म्हणून पाहत असतात. पाणी मिळत नाही म्हणून शेवटी 600 रूपये मोजून खाजगी टँकर बोलवावा लागतो. हा खर्च नागरिकांना आपल्या खिशातून करावा लागतो. इतका पाणीकर घेऊनही जर पाणी मिळत नसेल, तर पाणीकर का भरावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. रांगणा येथे वीज पुरवठा सुरळीत नसल्याने ही समस्या होत आहे. वीज नसल्याने पाण्याची टाकी पूर्ण भरत नाही. रोज 5 ते 6 तास वीज खंडित असते. उन्हाळ्याच्या कठीण दिवसांत नागरिकांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.