दणका: अखेर शिरपूर ठाणेदाराची रवानगी नियंत्रण कक्षात

'वणी बहुगुणी' नी केली होती अवैध धंद्याची पोलखोल

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांची कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अखेर बुधवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोळसा तस्करी, अवैध व्यवसाय, मटका, जुगार ‘कल्पक’ पद्धतीने सुरु असल्यामुळे ठाणेदार सचिन लुले यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका वसुलीबाज पोलीस कर्मचाऱ्यामुळे ठाणेदार सचिन लुले अडचणीत आल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात आहे. स्थानिक गुन्हा शाखा (एलसीबी) येथील सपोनि गजानन करेवार याना शिरपूर पोलीस स्टेशनची जवाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्याला अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही ठाण्याअंतर्गत सर्व अवैध धंदे बंद करणे हे अशक्य आहे. मात्र बाहेर सर्व बंद असल्याचा दिखावा करत आतून इतर ठाण्यापेक्षाही इथे सर्व प्रकारचे अवैध धंदे ‘अकल्पनीय’ पद्धतीने सुरू होते. ‘वणी बहुगुणी’ने ठाण्या अंतर्गत येणा-या या सर्व अवैध धंद्याबाबात सिरीज सुरू करत पुराव्यासह या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला होता. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणेदार लुले यांची कानउघाडणी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

अलिकडे चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्याने दारू तस्करी जवळपास बंद झाली होती. मात्र दुसरीकडे कोळसा तस्करीला चांगलाच ऊत आला होता. याबाबत शिरपूर मार्गे वेकोलितून होणा-या कोळसा तस्करीबाबत एका स्थानिक नेत्यांनी थेट एसपीकडे तक्रार केली होती. तक्रारीमुळे गेल्या आठवड्यात या बाबत कारवाईही करावी लागली होती. अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कोणतीही हयगय न करता ठाणेदार सचिन लुले यांची तात्काळ उचलबांगडी करुन नियंत्रण कक्षात बोलाविले.

‘वणी बहुगुणी’चा दणका
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रान्सपोर्टर कडून हफ्ता वसुली, अवैध दारु, मटका व कोंबड बाजार बाबत वणी बहुगुणीने बातम्यांची मालिका प्रकाशित केली होती. 3 ऑगस्ट 2021 ला ‘शिरपूर पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे ट्रान्स्पोर्टर त्रस्त”, 4 ऑगस्ट रोजी ‘शिरपूर पोलिसांच्या डोळ्यावर ‘मटकापट्टी’, 6 ऑगस्टला ‘पोलिसांचे नवीन ‘सुंदरकांड’, बडग्याच्या कोंबड बाजारासाठी ऍडव्हान्स बुकिंग’ आणि 8 ऑगस्टला ‘शिरपूर भागातील अवैध धंदे रोखणार कोण?’ या मथळ्याखाली व्हिडीओ पुराव्यानिशी पोलखोल केली होती.

हे देखील वाचा:

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

Comments are closed.