अपघात: गौराळाजवळ मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक

अपघातात एक ठार, तर एक गंभीर, खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरचे नियंत्रण सुटून मालवाहू वाहनाने (छोटा हत्ती) एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला तर मागे बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. तर मालवाहू वाहनामध्ये बसलेली एक महिला प्रवासीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील गौराळा फाट्याजवळ सकाळी सव्वा 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बाळकृष्ण महादेव पाचभाई वय 62 रा. कवठाळा ता. कोरपना असे मृतकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिवदास पायघन रा. भोईगांव, ता. कोरपना जि. चंद्रपूर असे आहे. 

मृतक बाळकृष्ण हे शिवदास यांच्यासह दुचाकीने (MH 22 AH 8506) पांढरदेवी जवळील वाई येथे औषधी घेण्यासाठी आले होते. आज सकाळी टाटा एस हे मालवाहू वाहन (MH29 T6354) शेतीच्या कामासाठी महिला मजुरांना घेऊन चिखलगावहून मारेगावच्या दिशेने जात होते. तर औषधी घेऊन बाळकृष्ण व शिवदास हे गावी परत जात होते. दरम्यान गौराळा फाट्याजवळ सव्वा 11 वाजताच्या सुमारास खड्याला चुकविण्याच्या नादात मालवाहू वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार बाळकृष्ण महादेव पाचभाई हे जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी शिवदास पायघन हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अनियंत्रित मालवाहू वाहन रस्त्याच्या खाली उतरले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी गोळा झाले. लोकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. जखमीला त्वरीत मारेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर शिवदास यांना वणी येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. मालवाहू वाहनातील कॅबिनमध्ये बसलेल्या एका महिलाही किरकोळ जखमी झाली आहे. प्रकरणाचा मारेगाव पोलीस तपास करीत आहेत.

हे देखील वाचा:

आत्महत्या: पोलवर चढून तरुणाचा विद्युत तारेला स्पर्श

Comments are closed.