मारेगाव-वणी रोडवरील “ते” खड्डे ठरताहेत जीवघेणे
प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, प्रशासन सुस्त
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव ते वणी रोडवर असलेले मोठ मोठे खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र संबंधीत विभागाला मात्र याच्याशी काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे.
करंजी ते वणी या राज्य महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले. मारेगाव ते वणी रस्त्यावर हे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली. अनेकवेळा या मार्गावर पडलेले खड्डे बुजविल्या गेले होते. परंतु बुजविलेल्या या खड्यानंतर लगेचच काही दिवसातच पुन्हा नव्या खड्यांना सुरुवात होत असते. या मार्गावर सध्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून यातील काही खड्डे हे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
सध्या पावसाळा सुरू असून या खड्यांमध्ये पाणी साचून खड्यांचा अंदाज येणे दुरापास्त झालेले आहे. नवीन प्रवासी किंवा रात्रीच्या वेळेस या मार्गाने जाणे खूपच धोकादायक बनलेले आहे. कधी कधी खड्याचा अंदाज न आल्याने अनेकजण या रस्त्यावरच आडवे होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. छोटे अपघात होत असताना नागरिक याची कुठेही तक्रार दाखल करीत नसल्याने आणि झालेल्या छोट्या अपघाताची कोठेही वाच्यता होत नसल्याने प्रशासन साखर झोपेत असल्याचे दिसत आहे.
या यवतमाळ-चंद्रपूर जोडणाऱ्या महामार्गावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत असले तरी संबंधीत विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डलेले हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन खड्डे मोठे होण्याची किंवा मोठा अपघात होण्याची प्रतीक्षा तर करत नाही असा संतप्त सवाल या मार्गावरील प्रवासी करीत आहे.
हे देखील वाचा:
वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो