वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

मुली अल्पवयीन की सज्ञान? संभ्रम कायम....

1

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळ असणारा रेड लाईट एरिया (प्रेमनगर) इथे एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात दोन मुलींची सुटका करण्यात आली. शुक्रवारी दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. मुलींना बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडणा-या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वणी येथील प्रेमनगर येथे अल्पवयीन मुलींकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याची माहिती नागपूर येथील एका सामाजिक संघटनेला मिळाली. त्यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळराव यांनी तातडीने एक पथक वणी पाठविले. विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी संशयित महिलेच्या घरावर धाड टाकली. तिथे पोलिसांना दोन मुली आढळून आल्या.

पोलिसांनी दोन्ही मुली व त्या मुलींकडून बळजबरीने देह विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही मुली रा. बदनापूर, जि. ग्वाल्हेर (म.प्र.) येथील आहे. त्या मुली अल्पवयीन आहे की सज्ञान हे स्पष्ट झालेले नाही. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले.

अनैतिक मानवीय वाहतूक प्रतिबंध कक्ष यवतमाळ येथील पो.नि. गंगाराम कऱ्हाडे यांच्या फिर्यादवरून वणी पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्द स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 3,4,5 तसेच भा.दं.वि. कलम 370 (4) व 370 (अ) (1) अनव्ये गुन्हा दाखल केले आहे.

मुली अल्पवयीन की सज्ञान?
नागपूर येथील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुटका करण्यात आलेल्या मुली अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींपैकी एकीने तिचे वय 23 वर्ष तर दुसरीने 24 वर्ष सांगितले आहे. सुटका करण्यात आलेल्या मुली अल्पवयीन आहे की नाही, याबाबत पोलीस संभ्रमात आहे. मुलींच्या वैद्यकिय तपासणीनंतर याचा उलगडा होणार आहे.

ताब्यात घेतल्या महिलेला शुक्रवारी सूचनापत्रावर सोडण्यात आले असता अधिक चौकशीसाठी आज तिला परत ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. यापूर्वीही हैद्राबाद पोलीस व इतर राज्यातील पोलिसांनी प्रेमनगर वस्तीत छापा टाकून देह व्यवसाय करणाऱ्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. वणीतील रेडलाईट एरिया येथे अल्वपयीन मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जातो याबाबत नागपूर येथील संघटना वेळोवेळी पाठपुरावा करते. मात्र स्थानिक पोलीस विभाग व सामाजिक संघटना यांचे याबाबत कायमच मौन असते.

हे पण वाचा…

शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

हे पण वाचा…

एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

1 Comment
  1. […] वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, … […]

Leave A Reply

Your email address will not be published.