ऑटो अपघातात पिंपरीचे महादेव खंडाळकर यांचा मृत्यू 

कायर ते पिंपरी रस्त्यावर झाला अपघात

0

बहुगुणी डेस्क, वणी:  प्रवासी ऑटो उलटून अपघात झाल्याची घटना कायर ते पिंपरी रस्त्यावर दि.19 गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात एका इसमाचा मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली. महादेव खंडाळकर (62) असे मृतकाचे नाव आहे. तर पंचफुला महादेव पिंपळशेंडे (64) रा. पिंपरी असे जखमी महिलेचे नाव आहे. घटनेची फिर्याद मृतकाचा मुलगा गणेश खंडाळकर यांनी शिरपूर पोलिसात दिली.

वणी तालुक्यातील कायर येथील गुरुवारच्या बाजारातील खरेदी आटोपून पिंपरी गावाकडे ऑटो (एम.एच. 29 ए.एम. 0762) ने प्रवासी जात होते. ऑटोत महादेव खंडाळकर, पंचफुला पिंपळशेंडे, नारायण अंगीलवार यांच्यासह आठ ते नऊ प्रवासी बसलेले होते. बाबापूर ते पिंपरी गावादरम्यान नत्थू पाटील भेंडाळे यांच्या शेतालगत ऑटोचालक नरेश गोंडे यांचे ऑटोवरील नियंत्रण सुटून भरधाव ऑटो उलटला.

यात महादेव खंडाळकर वाहनाच्या खाली दबले. ते गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी प्रथम कायरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. मात्र महादेव खंडाळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.

उत्तरीय तपासणी करून पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे घटनेच्या थोड्या वेळाने ऑटोचालकांनी अपघातग्रस्त ऑटो घटनास्थळावरून गावात आणल्याची माहिती आहे. मृतकाच्या मागे पत्नी, पाच विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे. मृतकाची पत्नी ही आजारानी पंगू झालेली आहे.

तिची सेवा पती महादेव करीत होते. सदर कुटुंब भूमिहीन असून सुतारकामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पतीच्या अपघाती मृत्यूने दिव्यांग पत्नीचा जगण्याचा आधार हिरावला आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

शुद्ध पाण्याच्या ‘कॅन’वर हरित लवादाचा ‘हातोडा’

हेदेखील वाचा

वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

Leave A Reply

Your email address will not be published.