रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळील रेडलाईट एरिया (प्रेमनगर) येथे सुरु असलेल्या देह व्यवसाय अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत दोन महिलांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीसह दोघीचीं सुटका केली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने मारेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात आली.

वणी येथील प्रेमनगर भागात अल्पवयीन मुलींकडून जबरीने देह व्यवसाय करवून घेत असल्याची तक्रार नागपूर येथील फ्रीडम फर्म या स्वयंसेवी संस्थेनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मारेगाव ठाणेदार यांना कारवाईचे आदेश दिले. रेड मारण्यासाठी पोलीस पथकाने सापळा रचला. मंगळवार 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान बनावट ग्राहक पाठवून सत्यता पटवून घेतली.

खात्री होताच बनावट ग्राहकाच्या सूचनेवरून परिसरात दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली. दरम्यान एका घरातून त्यांनी दोन महिलांना ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी त्या घरातुन अल्पवयीन मुलीसह आणखी एका तरुणीची देह व्यवसायातून सुटका केली.

सपोनि जगदीश मंडलवार यांच्या फिर्यादवरून अटक करण्यात आलेल्या महिला जान्हवी राजू धनावत (40) व सखू नत्थु कुरेकार (55) विरुद्द कलम 363, 366 (अ), 307 (1) सहकलम 3,4 अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायदा व सहकलम 4,6 बाल लैंगिक अत्याचार कायदानव्ये गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे करीत आहे.

स्थानिक पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह !
सदर धाड मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वात टाकण्यात आल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. या आधीही अनेकदा प्रेमनगर येथे धाड टाकून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. त्यावेळीही ही कारवाई यवतमाळ येथील पोलिसांनीच केली होती. शहरात अनेक ठिकाणी देहव्यापार सुरू आहे. याबाबत पोलिसांना माहिती असूनही अद्याप कारवाई केली गेली नाही. साई नगरी परिसरातही स्थानिक नागरिकांनी एका घरी धाड टाकली होती. या प्रकरणीही पोलिसांनी केवळ तंबी देऊन सोडून दिले होते. यावेळीही कार्यवाहीच्या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवल्याने त्यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा:

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, आज 7 पॉजिटिव्ह

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

Leave A Reply

Your email address will not be published.