जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी शहरातील फाले ले आऊटमध्ये एका पान सेंटरवर धाड टाकून सुगंधित सुपारी, सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 71,500 रुपये असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वणी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यांनी संयुक्तरित्या ही कार्यवाही केली.
शहरातील जैन ले आउटच्या नजीक असलेल्या फाले ले आउट येथील मुन्ना पान सेंटर येथे प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू व गुटख्यााच साठा असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वणी पोलिसांच्या चमुने संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास या पान सेंटरवर धाड टाकली. तिथे त्यांना प्रतिबंधीत माल आढळून आला.
या धाडीत पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधीत (मजा 108) तंबाखूचे 200 ग्रॅम व 50 ग्रॅम तंबाखूचे डब्बे ज्याची किंमत 65139 रु. पान पराग गुटखा 12 डब्बे किंमत 3600 रु. व अन्नी गोल्ड स्वीट सुपारी 46 पॅकेट ज्याची किंमत 2740 रुपये असा एकूण 71499 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुठून आला गुटखा व सुगंधीत तंबाखू?
या प्रकरणी पान सेंटर चालक मृणाल नवनाथ वेलेकर (33 वर्ष) रा. फाले ले आऊट वणी यास अटक करण्यात आली. पान सेंटर चालकाची चौकशी केली असता त्याने सदर माल घुग्गुस, जि. चंद्रपूर येथील नीरज रमेशचंद्र गुप्ता यांच्या कडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी नीरज रमेशचंद्र गुप्ता (28 वर्ष) याला देखील अटक केली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी विरुद्द कलम 26(2), 27, 30(2)(अ), 23, 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या सहकलम 188, 273, 272, 269, 270 भा.दं.वि. अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही उप.वि.पो.अ. संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शननात पो. नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोऊपनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोले, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार यांनी केली.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: