नागेश रायपुरे, मारेगाव: घरगुती शुल्लक कारणावरून मुलीच्या पाठोपात वडिलांनीदेखील विष प्राशन केले. यात मुलगी बचावली, तर वडिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे रात्री 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल जुमनाके (45) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक शेतकरी विठ्ठल जुमनाके यांना दारूचे व्यसन असल्याचे बोलले जाते. दोनच दिवसांपूर्वी त्याने कापूस विकून पैसे खर्च केले. या शुल्लक कारणावरून कुटुंबात वाद झाला. रागाच्या भरात मुलगी शिवानी (20) हिने 31 ऑक्टोबररोजी विष प्राशन केले. शिवानीने विष प्राशन करताच ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे 11.30 वाजता दरम्यान तिला भरती केले. शिवाणीवर वेळेवर उपचार झाल्याने ती बचावली.
आपल्या मुलीने विष घेतले हे बघून बापाचे मन पाझरले. अस्वस्थ होऊन वडील विठ्ठल जुमनाके शनिवारी 31 तारखेला मारेगाव ग्रामीण रुग्णालयातून 5 वाजतादरम्यान सरळ गावाकडे गेले. शेतात जाऊन विष प्राशन केले. विठ्ठल घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेणे सुरू झाले.
अखेर स्वतःच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. गावातील लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात होत असलेल्या सततच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे अवघा तालुका हादरला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)