कोंबडा बाजारावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

29 हजारांचा मुद्देमाल जप्त, एक पसार होण्यात यशस्वी

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील खंडणी जंगलात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. सदर घटना 11फेब्रुवारी रोज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. पोलीसांनी टाकलेल्या याधाडीमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी पसार झाल्याची माहिती आहे. 

Podar School 2025

खंडणीच्या जंगलात गेल्या वर्षभरापासून कोंबड बाजार भरवला जात होता. याची पोलिसांना माहिती होती. मात्र पोलिसांचे पथक धाड टाकायला जाण्याच्याच आधी कोंबड बाजार चालवणा-याच्या खबरीकडून त्यांना धाड बाबत माहिती मिळायची व घटनास्थळावरून सर्वच पसार व्हायचे. शुक्रवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी पोलिसांना खंडणीच्या जंगला कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता तिथे त्यांना कोंबड बाजार सुरू असल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांनी तिथे धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच तिथे एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी सिद्धार्थ बबन बहादे (वय 32) रा. सराटी, मनोज पुरुषोत्तम मोरे (वय 42) रा. सराटी या दोघांना अटक केली तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.

कारवाईत 3500 रुपये नगदी, एक कोंबडा किंमत अंदाजे 500, एक मोटारसायकल किंमत 25 हजार रुपये असा एकूण 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.