मटका जुगार विरुद्ध वणी पोलिसांची धडक मोहीम

9 दिवसात 11 धाड, 25 आरोपीच्या आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: मटका, जुगार, अवैध दारू विक्री विरोधात वणी पोलीस धडक मोहीम सुरू केली आहे. मागील 9 दिवसात वणी पोलिसांनी शहरात 11 ठिकाणी धाड टाकून मटका पट्टी चालवणा-या 25 जणांना अटक केली. तर काही लोक फरार होण्यातही यशस्वी झाले. पोलिसांनी आरोपीकडून 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. शिवाय या कालवधीत पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 11 आरोपींविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केल्याची नोंद आहे.

ठाणेदार अजित जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी 2 नोव्हे. रोजी शहरातील शास्त्रीनगर भागात धाड टाकून सार्वजनीक ठिकाणी सुरु वरली मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्याच दिवशी नगर परिषद सुलभ शौचालय जवळ, 3 नोव्हे. रोजी ब्राह्मणी फाटा, दीपक चौपाटी भाजी मंडी परिसरात 3 ठिकाणी, 4 नोव्हे. रोजी बीएसएनएल कार्यालय जवळ, 7 नोव्हे. रोजी राजूर कॉलरी येथील तेलगु वार्ड व बौद्धविहार जवळ, 8 नोव्हे. रोजी दीपक चौपाटी व बीएसएनएल कार्यालय जवळ तर 9 नोव्हे. रोजी पंचशील नगर येथे पोलिसांनी वरली मटका अड्ड्यावर छापा टाकला.

अवैध धंद्याविरुद्द सुरु असलेल्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण 25 आरोपींना अटक केली. काही आरोपी धाड टाकताच फरार देखील झाले. आरोपींच्या अंगझडतीमध्ये पोलिसांनी रोख, मटकापट्टी व इतर साहित्य असा एकूण 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.