रुळावरून जाणा-या तरुणाला रेल्वेची धडक, तरुणाचा मृत्यू

मांगली येथील घटना, मोबाईलवर बोलणे बेतले जीवावर?

बहुगुणी डेस्क, वणी: रेल्वे रुळावरून जात असताना एका मालगाडीने एका तरुणास धडक दिली. झरी तालुक्यातील मांगली येथील ही घटना असून रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आकाश रविंद्र सातघरे असे मृत तरुणाचे नाव आहे. मोबाईलवर बोलत जाताना मालगाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. एकुलता एक मुलाच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Podar School 2025

आकाश रविंद्र सातघरे (21) हा मांगली ता. झरी येथील रहिवासी होता. तो गावातील एका दुकानात काम करायचा. सध्या मांगली गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दिनांक 6 मार्च रोजी या कार्यक्रमाची सांगता होती. त्यामुळे तो सुटी काढून सप्ताहात सामील झाला होता. रात्री कार्यक्रम संपल्यावर 8 वाजेनंतर तो गावालगत असलेल्या रेल्वे रुळाकडे शौचास गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

8.30 वाजताच्या सुमारास तो रेल्वे रुळाच्या मधून पायी येत होता. दरम्यान अदिलाबादच्या दिशेकडून वणीच्या दिशेने एक मालगाडी येत होती. या मालगाडीने रेल्वेच्या रुळाच्या मधून पायी जात असलेल्या आकाशला जबर धडक दिली. मालगाडीने त्याला सुमारे 20 मीटर फरफटत नेले.

रात्री 9.30 वाजताच्या सुमारास गावातील काही तरुण शौचास गेले असता त्यांना रेल्वेरुळावर आकाशचा मृतदेह पडलेला आढळला. त्यांनी याची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळ पोहोचले. त्यांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

आकाशच्या मृतदेहा शेजारी मोबाईल पडलेला आढळला आहे. त्यामुळे रेल्वेरुळाच्या मधून मोबाईलवर बोलत पायी जात असताना धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. आकाश हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दोन्ही बहिणीचे लग्न झाले आहे. आकाशच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाता आहे. घटनेचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका

Comments are closed.