सुनील इंदुवामन ठाकरे:
आभाळ जिथे घन गर्जे
ते गावा मनाशी निजले
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडले
कवी ग्रेस यांच्या ओळी रात्री आलेल्या पावसाचा अदमास घेतात. ग्रेस यांच्या कवितांमधून पाऊस वेगळ्या संदर्भांतून अनेकदा कोसळतो. त्यांच्या ‘‘चंद्रमाधवीचे प्रदेश’’ या कवितासंग्रहात तर पाऊस आणि पाणी कितीदा तरी वेगवेगळ्या अर्थछटा घेऊन आलेत. असाच अंधार भिजवणारा पाऊस शनिवारी रात्री वणीकरांनी अनुभवला.
रात्री सव्वा अकराच्या सुमारास रविवारी पाऊस आला. पाऊस आणि विजेचं जमत नसावं कदाचित, म्हणून तो आला आणि ती गेली. ढगांचा गडगडाट सुरू झाला. ‘‘आषाढ का एक दिन’’चा फील मे महिन्यातच आला. पाऊस येत राहिला. चांगल्याच सरी कोसळल्या. पहिल्या पावसाने मातीचा गंध दरवाळावा त्याचा प्रत्ययदेखील आला.
सध्या वणीत तर प्रचंड पाण्याची टंचाई आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने बरेच झाले. हवेत गारवा आला. एसी व कुलरने बंद असलेल्या घरांची दारे व खिडक्या वीज जाता जाता उघडून गेली. मजबुरीने का असेना मोकळ्या खिडक्या व दारांतून थोडासा भिजलेला वारा आता घरात डोकवायला लागला.
लेकुरवाळ्या व ज्येष्ठ किंवा आजारी असलेल्या घरांना याची झळ पोहचली. एवढं लिहिपर्यंत वीज आलीच नव्हती. पण मोकळ्या खिडक्यांतून अंधाराला भिजवणारा पाऊस थेट माजघरापर्यंत शिरत होता. पावसाने बेमौसम हजेरी लावत तो मुडीच आहे हे पुन्हा सिद्ध केले. आपणही आलेल्या अतिथींचे स्वागत करणारे आहोत. म्हणून अनेक रसिकांनी त्याचेदेखील अवेळीच स्वागत केले.