अवैध सायडिंग विरोधात राजूरवासीयांनी फुंकले रणशिंग, महिलांचे आमरण उपोषण सुरू
राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने आजपासून आंदोलनाला सुरुवात... संघर्षाला माकप व संविधानिक हक्क परिषदेचे समर्थन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे रेल्वे व वेकोलिचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर चार महिला उपोषणाला बसल्या असून जोपर्यंत रेल्वे सायडिंग हटवली जात नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी यांनी अवैध सायडिंग हटविण्यासंदर्भात आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी गेल्या 1 महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे राजूरवासीयांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
राजूर येथे आलेल्या वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या कोळसा सायडिंग व वेकोलिचे होत असलेले खाजगीकरण ह्यामुळे येथील राहिवासीयांना त्यांची राहत असलेली घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्रालगत असल्याने गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावात वेगवेगळ्या आजारांचे प्रादुर्भाव होत आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे सुरू असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपोला स्थानिक स्वराज्य संस्थेची व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसल्याने त्या अनधिकृत आहेत. या संदर्भात गेल्या 10 महिन्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी अवैध सायडिंग हटविण्यासंदर्भात आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी मात्र गेल्या 1 महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे शेवटी राजूर बचाव संघर्ष समिती चे वतीने दि. 17 ऑक्टो 22, सोमवार पासून बेमुदत आमरण उपोषण वणी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे.
उपोषणाला माकप व संविधानिक हक्क परिषदेचे समर्थन
आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शंकरराव दानव व अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदेचे कॉ. गीत घोष यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. दरम्यान त्यांनी उपोषणकर्त्यांसोबत या प्रश्नी चर्चा केली. त्यांनी राजूर वासीयांच्या हक्काच्या लढाईला समर्थन देत संघर्षात सोबत असल्याचे वचन दिले.
ह्या आमरण उपोषणाला दिशा अमृत फुलझेले, नाजूका प्रशांत बहादे, वीणा अमर तितरे व शालू संजय पंधरे ह्या बसल्या आहेत. ह्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच विद्या पेरकावार, संघदीप भगत, अशोक वानखेडे, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, ऍड. अरविंद सिडाम, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, सावन पाटील, अमृत फुलझेले, नंदकिशोर लोहकरे, प्रदीप बांधुरकर साजिद खान, नितीन मिलमिले, अमर तितरे, अभिषेक अंडेल, सनी राजनालवार, अजित यादव, अनवर खान, अकरम वारसी व अन्य परिश्रम घेत आहेत.
हे देखील वाचा:
वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत
पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?
Comments are closed.