मुकुटबन ते बोरी मार्गाच्या निकृष्ट बांधकामाविरोधात आज रास्तारोको आंदोलन
84 कोटींच्या रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी
सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते पाटण बोरी राज्य मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्ता दुरुस्तीच्या कामसाठी गावकरी आता आक्रमक झाले आहे. आज शुक्रवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी या बाबत 11 वाजता सरपंच व गावकरी हे पाटण येथे आंदोलन करणार आहेत. 84 कोटींच्या निकृष्ट कामाच्या चौकशी करावी व रस्ता पुन्हा तयार करावा अशी गावक-यांची मागणी आहे.
पाटण ते बोरी 16 किमी अंतराच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. तर, मुकुटबन ते पाटण दरम्यान नवीन रस्ता डांबरीकरण केलेला आहे परंतु एका महिन्यातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रोड उखडायला सुरवात झाली आहे. सदर काम घेतलेला कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचा आरोप तालुक्यातील सरपंच व ग्रामवासींनी केला आहे.
पाटण ते बोरी पर्यंत होणाऱ्या कामात मोठा अपहार होत असून साईड पट्टीचे खोदकाम कमी असून मुरूम सुद्धा अल्प प्रमाणात टाकण्यात आला असे गावक-यांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी पुलाजवळ मुरूम न टाकल्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सरपंच निलेश येल्टीवार ,संदीप बुरेवार ,छोटू राऊत युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर व हरिदास गुर्जलवार यांनी बांधकाम विभाग पांढरकवडा येथे तक्रार देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.
सदर रस्त्याच्या कामाकडे संबंधीत अभियंता दुर्लक्ष करीत असून लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळेच असे काम झाले असून खड्ड्यामध्ये गिट्टी व दंड टाकून बुजविण्यात आले. असा आरोप गावचे सरपंच व गावक-यांनी केला आहे. एका महिन्यात नवीन रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने भविष्यात हा रस्ता टिकेल का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असले तरी प्रशासन कंत्राटदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू मुकुटबन ते पाटण रस्ता पुन्हा तयार करावा अशी मागणी सरपंच संदीप बुरेवार यांनी केली आहे. तालुक्यातील समस्त सरपंच व ग्रामवासीयांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा असेही आवाहन ही करण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
15 ऑगस्ट निमित्त मयूर मार्केटिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा भव्य सेल
आनंदाची बातमी… आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘फ्रिडम’ सेलला सुरूवात…