वणीतून कोरोना रुग्ण घेऊन जाणा-या ऍम्बुलन्सला रोहीची धडक
वरो-यानजीक अपघात, रुग्णाला घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते जखमी
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना बाधीत रुग्णाला वणीहून नागपूरला हलवताना ऍम्बुलन्सला वरो-यानजीक एका रोहीने धडक दिली. यात रुग्णासोबत असलेले समाजसेवक जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून ऍम्बुलन्सला नुकसान झाल्याने रुग्णाची दुस-या ऍम्बुलन्सद्वारा व्यवस्था करण्यात आली आहे.
वणीतील एका कोरोना बाधीत रुग्णावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. रुग्णासोबत कुणीही नसल्याने वणीतील सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव हे त्यांच्यासोबत ऍम्बुलन्समधून नागपूरसाठी जाण्यास निघाले.
संध्याकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान ऍम्बुलन्स वणीहून नागपूरसाठी निघाली. दरम्यान 7 वाजताच्या सुमारास वरो-याच्या दोन ते तिन किलोमीटर आधी धावत्या ऍम्बुलन्सला एका रोहीने मागून धडक दिली. या अपघातात सागर जाधव हे मागच्या बाजूने बसून असल्याने ते जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांच्या तोंडाला मार लागला.
सुदैवाने यात ऍम्बुलन्स चालक, रुग्ण व रुग्णाच्या सहका-याला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघातात ऍम्बुलन्स बंद झाली. जखमी सागर जाधव यांच्यावर वरो-यामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र या परिस्थितीतही सागर जाधव यांनी तातडीने दुसरी ऍम्बुलन्सची व्यवस्था केली व त्याद्वारे रुग्णाला नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
व्यवसायाने शिक्षक असलेले सागर जाधव हे पर्यावरण व इतर सामाजिक कार्याॉत कायम अग्रेसर राहिले आहेत. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. काही दिवसांआधी ते स्वत; कोविड पॉझिटिव्ह होते. मात्र त्यातून ते बरे झाल्यानंतर ते पुन्हा कामाला लागले होते. अपघात होण्याच्या काही तास आधी त्यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या रुग्णांचे मनोधर्य वाढवले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असून वणीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार केल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा: