जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री, प्रशासनाचे दुर्लक्ष

टंचाईचे कारण देत व्यापा-यांकडून ग्राहकांची लूट

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लाकडाऊन सुरू आहे. यात फक्त जीवनावश्यक वाटू वगळता इतर सेवा बंद आहे. जीवनावश्यक वस्तूचे कोणताही दुकानदार भाव वाढवणार नाही अशी सक्त ताकीद प्रशासनाकडून देण्यात आली असतानाही शहरात अनेक व्यापारी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री करीत आहे. देश सध्या संकटात असताना काही व्यापारी त्याचा फायदा घेत जनतेची लूट करीत आहे. राज्य सरकारने राज्यात कोणतीही टंचाई नसल्याचे जाहीर केल्यानंतरही प्रशनासन अशा व्यापा-यांविरोधात  कारवाई का करीत नाही असा प्रश्न उपस्थित करत आहे.

साखर आधी 36 रुपये किलो होती ती आता 40 रुपये झाली आहे. जो गहू आधी 24 रु. किलो होता तो आता 28 रु, जो तांदूळ आधी 38 ते 40 रुपये होता आता 44, 46 रुपये. तुरीची डाळ आधी 75 रुपये किलो होती आता 85 रुपये किलो झाली आहे. तर खाद्य तेलाची 15 लिटरची कॅन लॉकडाउन होण्याअगोदर 1200 रूपायांची होती. त्याच कॅनसाठी आता 1560 रुपये मोजावे लागत आहेत. .

कोरनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे गरीब आणि मजुर वर्गाचा रोजगार गेला आहे. अशा कठिण परिस्थितीत मात्र काही व्यापा-यांनी या परिस्थितीचा फायदा उचलण्याचे ठरवून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने काही व्यापा-यांशी संपर्क साधला असता त्यांनी माल येणे बंद असल्याने मालाची टंचाई आहे. परिणामी भावात वाढ झाली आहे अशी माहिती दिली आहे.

याबाबत माहिती काढली असता जीवनावश्य वस्तूंच्या वाहतुकीस प्रशासनाने कोणताही बंदी आणली नसल्याने नागपूरहून वणीमध्ये आधीसारखाच माल पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे काही व्यापारी कोरोनात आलेल्या आपत्तीचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासन काय करीत आहे?
एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारने जनतेला आश्वस्त करत टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी चढ्या भावाने विक्री करणा-या व्यापा-यांवर कारवाई करण्यात आली. मात्र वणीतही राजरोसपणे व्यापारी ग्राहकांची लूट करीत असताना प्रसासन अद्याप त्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.