धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू
वणीत मंगळवारी दोघांचा मृत्यू,... सॅनिटायझर प्यायल्याने चार दिवसांमध्ये 8 जणांचा मृत्यू
जितेंद्र कोठारी, वणी: आज माळीपु-यात एकाचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याच परिसरात असलेल्या शिवाजी चौकजवळ आणखी एका व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. नागेश लक्ष्मण दर्वे (45) असे मृतकाचे नाव असून त्यांचे आंबेडकर चौकात कटिंगचे दुकान होते. आतापर्यंत वणीत सॅनिटानयझर प्यायल्याने 8 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
आज मंगळवारी दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान माळीपु-यात राहणा-या अनिल चंपतराव गोलाईत (49) यांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवाजी चौक इथे राहणा-या नागेश लक्ष्मण दर्वे (45) यांचा संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. अनिल आणि नागेश हे मित्र असल्याची माहिती आहे. त्यांना दारू पिण्याची सवय होती.
लॉकडाऊनमुळे दारू बंद असल्याने नागेश यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून सॅनिटायझर प्यायला सुरूवात केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याबाबत समजावून देखील सांगितले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नागेश यांचे सॅनिटायझरचे सेवन करणे सुरूच होते. सॅनिटाझर प्यायल्याने त्यांची तब्येत देखील खराब झाली होती.
आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास नागेश यांना ओकारी होऊन त्यांची प्रकृती अधिक खराब झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अवघ्या एका तासाच्या अवधीतच उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. नागेश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहे.
कोरोनापेक्षा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू अधिक !
वणीत सॅनिटायझरमुळे सुरू असलेले मृत्यूचे तांडव काही केल्या थांबताना दिसत नाही. शनिवारी संध्याकाळी सॅनिटायझर प्यायल्याने 3 व्यक्तींचा, रविवारी पहाटे आणखी तिघांचा तर मंगळवारी 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. अवघ्या चार दिवसांमध्ये 8 जणांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्याने वणी शहर हादरून गेले आहे. विशेष म्हणजे शहरात कोरोनापेक्षा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू अधिक होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दारूवरची बंदी उठवावी अशी मागणीही जोर धरत आहे.
हे देखील वाचा:
आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल